संशयिताला अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी
मडगाव : वाद्य शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करत लैंगिक छळ केल्याप्रकरणी संशयित सय्यद अली (५७, रा. खारेबांध, मूळ डोंगरी, मुंबई) याला मायना कुडतरी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रातील एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाची तक्रार पोलिसांत दाखल झाली. याप्रकरणी तपासाअंती मायना कुडतरी पोलिसांनी संशयित सय्यद अली याच्याविरोधात गोवा बाल संरक्षण कायदा व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. सय्यद अली हा मूळ मुंबई येथील असून ढोलकी वाद्य विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे. तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलीला ढोलकी वाजवण्यास शिकवण्याचा बहाणा करत संशयिताकडून तिच्याशी गैरवर्तन करत लैंगिक छळ केला जात होता. याप्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीनंतर संशयितावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.