ती फक्त एक कॉलेजला जाणारी साधी मुलगी डोळ्यांत स्वप्नांची गर्दी, मनात गोंधळाची सावली आणि एक दिवस... एक नजर, एक क्षण... आणि ती हरवून बसली.
निसर्गावर सतत लिहिणारी ती, आता स्वतःच्या भावना शब्दांत उतरवू लागली होती. प्रेम हे आधी अनोळखी वाटणारे आता तिच्या प्रत्येक ओळीत मिसळले होते. पूर्वी तिच्या लिखाणात शब्द होते, पण त्यात हृदय नव्हतं. आता मात्र तिच्या प्रत्येक शब्दात एकच स्पंदन होतं — “तो!”
तिला त्याच्यात सर्वात जास्त काय भावलं? काहीतरी असं... जे तिला त्याला विसरू देत नव्हतं — तो आवाज. रेडिओवरचा त्याचा पहिला कार्यक्रम, जो तिने बारावीत असताना ऐकला होता. आजही तिला स्पष्ट आठवत होता.
त्या कोवळ्या वयात त्या आवाजानं तिला बांधून ठेवलं होतं. ती त्याला ओळखू पाहत होती — शब्दांमधून, सुरांमधून, कवितांमधून. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. आणि तो दिवस तिच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरला.
तिने त्याला जवळून पाहिलं, आणि त्या शांत डोळ्यांत ती पूर्णपणे हरवून गेली. एक हात खिशात ठेवून चालणारा तो, तिला वाटलं — नशीबच तिच्या पुढे चालत आहे.
ती गोंधळली... “काय बोलू? कसं बोलू?” कार्यक्रम संपला. सगळे निघाले... तीही निघाली. पण मन मात्र स्टेजवर त्याच्याच चेहऱ्याकडे थांबलेलं.
ती धावत सुटली... “आता तरी भेट होईल” या आशेने. पण नाही. मनात असलेली माणसं नशिबात असतीलच असं नाही. ती शांतपणे घरी निघाली... “गुंतणं बरोबर नाही,” असा विचार करत...
पण म्हणतात ना “जिथे ओढ असते, तिथे वाट आपोआप सापडते.” तसंच काहीसं घडलं...
रविवारचा निवांत दिवस पोहे, चहा, पेपर... आणि मग जेवणाची लगबग. इतक्यात फोनवर मेसेज आला “उद्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर यायचं. कॉलेजमध्ये गझल कार्यक्रम आहे.”
झालं! तिची आतली धावपळ सुरू झाली. प्रत्येक क्षण मोजू लागली. ती पुन्हा त्याला पाहण्यासाठी आतुर झाली.
बसस्टॉपवर पोहोचली. मनात एक गोंधळ – कुठली बस? किती वेळ लागेल? तेवढ्यात... समोर एक गाडी येऊन थांबली. ड्रायव्हर सीटकडे पाहिलं आणि... तो!
तिचं काळीज क्षणभर थांबलं. तो म्हणाला, “अगं तू...?” — तिच्या मैत्रिणीकडे बघत. त्या दोघी त्याच्यासोबत गाडीत बसल्या.
ती त्याचे डोळे गाडीच्या आरशातून पाहत होती... ते चोरून बघणं तिला लाजवणारं नव्हतं, ती तर त्या नजरेतच जगत होती. तिला वाटलं – हा प्रवास थोडा अजून लांब असावा...
कार्यक्रम सुरू झाला. तो स्टेजवर. नेहमीसारखाच... शांत, स्थिर, जणू शब्दांचं देणं देणारा. तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांत, आवाजात आणि अस्तित्वात.
तो बोलत होता, आणि ती त्याच्यात बुडून जात होती. त्याचं बोलणं कधी संपलं, तिलाही कळलं नाही. नंतर... त्याने तिला पाहिलं. मायेने हसला. ती काहीतरी लिहित होती... त्याच्या लक्षात आलं.
घरी परतताना पुन्हा ती त्याच्याच गाडीत होती. “लिहायला आवडतं का तुला?” त्याचा प्रश्न. तिचं नाव त्याच्या तोंडून ऐकून ती गोंधळली... पण सुखावली.
“हो...” “काय लिहित होतीस?” “कविता,” ती म्हणाली. मैत्रिणीने म्हटलं, “वाच ना...” नाइलाजाने तिने सुरुवात केली.
ओळख न तुझी माझी, तरी तू ओळखीचा. तुझ्या-माझ्यातलं अंतर, कोणालाच न कळणारं. तुला पाहताच प्रेमात अडकले, कसं विचारू तुला – का तुला मी आवडले?”
“अरे वा!” – तो म्हणाला. तिच्या कवितेने त्याचं मन जिंकलं होतं. त्याने पुन्हा तिच्याकडे एक हळवी नजर टाकली... आणि रेडिओवर वाजू लागलं – “पहिलीच भेट झाली या दोन लोचनांची...”
ती गाडीतून उतरली... पण तो तिच्या मनात खोलवर रुजून गेला होता.
घराकडे जाताना ती विचारात होती – हेच प्रेम असतं का? डोळ्यांत जे दिसलं, ते खरंच होतं का? त्याच्या कविता आवडतात म्हणूनच का तो आवडतो? का काहीतरी वेगळंच आहे?
“मीच का बोलू त्याच्याशी? पण... कसं?” असे विचार करत काही महिने गेले.
एक दिवस... त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. पुस्तकावर मोबाईल नंबर छापलेला होता. ती हरखून गेली.
तीन वाजेपर्यंत वाट पाहिली... आई झोपली की लँडलाइनवरून कॉल करता येईल, म्हणून. तीन वाजले. नंबर डायल केला – ९१...
रिंग वाजली. एका बाईंचा आवाज – “हो, थांबा... बोलावते.”
तेवढ्यात मोठ्याने ओरडत त्या म्हणाल्या — “अहो! ऐकता का? कोणाचा तरी फोन आलाय!”
“अहो...” तो शब्द तिच्या कानावर पडताच... तिचं मन थांबलं.
ज्याच्या मिठीत उत्तर मिळेल असं वाटलं होतं, त्याच्या घरातून आलेल्या त्या आवाजाने... ती शांत झाली.
सुरू व्हायच्या आधीच तिची गोष्ट संपली होती...
स्नेहा गावडे