गोवा मुक्तीनंतर गोच्यातील वाहतुकीत बदल झाले आणि पुलांची निर्मिती झाली. १९७० च्या दशकातील हिप्पी संस्कृतीमुळे गोव्याला जागतिक ओळख मिळाली असली, तरी त्यासोबतच व्यसनाधीनतेची समस्याही वाढली. सनबर्नसारख्या उत्सवाच्या गोव्याच्या युवा पिढीवर दुष्परिणाम झाले.
१९५७चा मे महिना. शेजारच्या विठ्ठलादेवी गावातील धर्मा परब मास्तरांच्या शाळेत मी तिसरीत शिकत होतो. कंदिलाच्या उजेडात अभ्यास करताना डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने डोळे तपासणी करण्यासाठी माझ्या मोठ्या भावाने मला पणजीला आणले. बेतीत डबल होडीत बसून आम्ही पणजी गाठली. चर्चच्या जवळपास असलेल्या एका नेत्रतज्ज्ञाकडे गेल्यावर त्यांनी काही अक्षरे वाचण्यास सांगितले. मला एबीसीडी वाचता येत नाही हे लक्षात येताच त्याने देवनागरी अक्षरे आणली. हे सगळे सोपस्कार आटोपल्यानंतर चष्मा लागेल असेही सांगितले. ४-५ दिवसांनी मला चष्मा मिळाला. आमच्या घरातील मी पहिला चष्मेबहाद्दर बनलो होतो.
गोवा मुक्तीनतर १९६४ मध्ये मी शिकण्यासाठी मी राय येथे गेलो. या वेळी बेतीत फेरीबोट होती. फेरी किनाऱ्याजवळ पोहचली की तिला दोन आडव्या शिड्या लावल्या जायच्या. सर्व प्रवासी उतरल्यावर सर्कस करत मोटारी बाहेर काढल्या जायच्या. त्यावेळी पणजीतील मुख्य टपाल कार्यालयाजवळून मडगाव बसेस एक सुटायच्या. पोर्तुगीज काळात धावणाऱ्या कार्रेर बंद होऊन एव्हाना बसेस सुरू झाल्या होत्या. पणजीहून फोंडा मार्गे मडगावला जाणाऱ्या बसेस बोरी पुलजवळ पोहचल्यावर प्रवाशांना खाली उतरुन चालून पलिकडे जावे लागे. गोवा मुक्ती मोहिमेत पोर्तुगीजांनी बोरी पूल स्फोटके पेरुन उडवून दिला होता. भारतीय लष्कराने तो दुरुस्त केला होता. बोरीचा नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर बोरीचा हा बेली पूल कोलवाळला हलविण्यात आला. कोलवाळ नदीवरील वाहतूक सुरळीत करण्यात या पुलाने महत्त्वाची कामगिरी बजावली. १९८० मध्ये पायाभरणी झालेल्या कोलवाळ पुलाचे काम दीर्घकाळ रेंगाळत पडलेले होते. आता कोलवाळ व शिवोली हे दोन प्रमुख पूल कार्यरत आहेत.
१९७० च्या दशकात शांतीच्या शोधात जगभर भटकणाऱ्या पाश्चिमात्य देशातील हिप्पी लोक गोव्यात पोहचले. त्यांना हवा असलेला एकांत व शांतता त्यांना गोव्यातील शांत समुद्रकिनारी सापडली. त्यांनी गोव्यातील समुद्र किनाऱ्याची महती जगभर पोहोचवली. गोवा सरकारने कोणतीही प्रसिद्धी न करता गोवा हे जगातील उत्तमोत्तम पर्यटन केंद्र असल्याचा प्रचार व प्रसार जगभर झाला. हिप्पीचे माहेरघर असलेल्या युरोपियन देशांतील पर्यटक गोव्यात आले. हिप्पी लोक गेले पण गोमंतकीयांना मादक पदार्थांचे न सुटणारे व्यसन लावून गेले. आता गोमंतकीय तरुण व्यसनाधीन बनून सनबर्नसाठी लढण्यास तयार झाले आहेत. धारगळसारख्या गावात सनबर्न आयोजित करा म्हणून पंचायतीने जी मोहीम उघडली होती त्यामागे कोण होते हे लोकांना कळलं पाहिजे.
यंदा सनबर्न गोव्याबाहेर होणार अशी घोषणा आयोजकांनी केली आहे. सनबर्न गोव्यातच व्हावा अशी मागणी काही राजकीय नेत्यांनी केली आहे. सनबर्न गोव्याबाहेर जात असेल तर आम्ही स्वागतच करु असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले पाहिजे. डिसेंबर अखेरीस होणाऱ्या या तथाकथित सनबर्नमुळे दरवर्षी हजारो युवक व्यसनाधीन होत असतील, ४-५ युवकांचे ड्रग सेवनाने बळी जात असतील तर आम्हाला सनबर्न नकोच असं सरकारने जाहीर केले पाहिजे.
मुक्तीपूर्व काळात पोर्तुगीज सरकारने उत्तर गोव्यातील नद्यांवर एकही पूल बांधला नव्हता, ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी केवळ जुवारी नदीवर बोरी येथे, कुंभारजुवे कालव्यावर बाणस्तारी येथे आणि केपे येथे पूल बांधले. या पुलांच्या उभारणीमागे सामान्य जनतेची सोय हा उद्देश नव्हता, तर त्यांचे आर्थिक हितसंबंध जपले गेले होते.
या दोन्ही नद्यांचा वापर प्रामुख्याने लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी होत असे. पोर्तुगीजांना गोव्यातील नैसर्गिक संपत्तीचा, विशेषतः खनिज संपत्तीचा, पुरेपूर फायदा उठवायचा होता. त्यामुळे, खाणकामातून मिळणारे लोहखनिज बंदरांपर्यंत सहज आणि जलद पोहोचवण्यासाठी त्यांनी या भागांत पूल बांधण्याला प्राधान्य दिले. ही कृती त्यांच्या आर्थिक गरजांवर आधारित होती, लोकांच्या गरजांवर नाही.
त्याचवेळी, उत्तर गोव्याला राजधानी पणजी या शहराशी जोडण्यात पोर्तुगीजांना कोणताही रस नव्हता. बेतीसारख्या ठिकाणी पूल बांधण्याचा विचारही त्यांच्या काळात झाला नाही, हे यावरून स्पष्ट होते. लोकांच्या दळणवळणाची सोय करणे, व्यापाराला चालना देणे किंवा सामाजिक एकोपा वाढवणे अशा गोष्टींना त्यांनी दुय्यम स्थान दिले. त्यांचे लक्ष केवळ त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यावर केंद्रित होते. यामुळे गोव्याच्या विकासात एक मोठी दरी निर्माण झाली, जी मुक्तीनंतरच भरून काढता आली.
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)