कृष्णा, मलप्रभासह सहाही नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी : अनेक पूल पाण्याखाली
बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील पाण्याखाली गेलेला पूल. (लुईस रॉड्रिग्ज)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : सलग तिसऱ्या दिवशी बेळगाव व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. आठ पूल पाण्याखाली गेले आहेत.
जांबोटी व कणकुंबी भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. कळसा, भांडुरा आणि हलतर व्हाळ व ओढे दुथडी भरून वाहू लागल्यामुळे भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यतील नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, १८ गावांचा संपर्क पूल पाण्याखाली गेल्यामुळे तुटला आहे.
हलतर ओढा धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, या मार्गावरील पूल केव्हाही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने नागरिकांना खानापूर-गोवा मार्गावरून हेमडगामार्गे प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
दुसऱ्या बाजूला वेदगंगा नदीवरील अक्कोळ-सिदनाळ, जत्रट-भिवशी, भरवड-कुन्नूर आणि दूधगंगा नदीवरील कारदगा-भोज, भोजवाडी-कुन्नूर, मलिकवाड-दत्तवाड पूलांवर पुराचे पाणी आले आहे. कृष्णा नदीवरील एकसंबा-दत्तवाड, कल्लोळ-यडूर आणि बावणसौंदत्ती-मांजरी हे पूल जलमय झाले आहेत. संपर्क तुटलेली सर्व १८ गावे बेळगाव शेजारच्या चिकोडी तालुक्यातील आहेत. मार्कंडेय धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी रात्री ४,००० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. मंगळवारी वाढवून ५,५०० क्यूसेक करण्यात आले.
मलप्रभा नदीत ९,००० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते, जे सोमवारी सोडलेल्या पाण्याच्या तुलनेत ४,००० क्यूसेक जास्त आहे. जिल्ह्यातील सर्व जलाशय, मलप्रभा नदीवरील रेणुका सागरासह पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्यात येत आहे.