तब्बल ६९ लाखांना लुबाडले; सायबर विभागाकडून गुन्हा दाखल
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून बार्देश तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला ६९.७५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी बार्देश तालुक्यातील पर्वरी येथील ६७ वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ५ जुलै आणि २३ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी वेगवेगळ्या मोबाईल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदाराला ८८५७९३०३८३ आणि इतर व्हॉट्सअॅप मोबाईलधारकांनी तक्रारदाराला ‘३६०-वन-एचएनडब्ल्यू’ हा शेअर ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकांच्या खात्यात सुमारे ६९ लाख ७५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला अॅपवर ५ कोटी रुपये जमा झाल्याचे दाखवण्यात आले. त्याने वरील रक्कम काढण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्याला शुल्क म्हणून आणखी ७५ लाख ७१ हजार ६८५ रुपये जमा करण्यास सांगितले. संशय आल्यामुळे त्याने वरील अॅपची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९ (२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.