उत्तेजक चाचणीत विक्रमी २६० भारतीय खेळाडू दोषी

नाडाचा अहवाल : २०२४ मधील आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10th August, 11:45 pm
उत्तेजक चाचणीत विक्रमी २६० भारतीय खेळाडू दोषी

नवी दिल्ली : २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचण्यांमध्ये २६० भारतीय खेळाडू दोषी ठरले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंदवलेली संख्या आहे. ही माहिती राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी देण्यात आली.
राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक एजन्सी (नाडा) कडून २०२४ मध्ये ७,४६६ उत्तेजक चाचण्या घेण्यात आल्या. भारतातील ही चाचण्यांची संख्या आजवरची सर्वोच्च आहे. यापूर्वी २०१९ मध्ये २२४ दोषी खेळाडू ही सर्वाधिक संख्या होती.
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक एजन्सी (वाडा) च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये भारतात २१३ खेळाडू उत्तेजक चाचणीत अपात्र ठरले होते. त्या तुलनेत २०२४ मध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सरकारला प्रश्न विचारला की, भारतीय खेळाडूंमध्ये उत्तेजक चाचणीत दोषी ठरणाऱ्यांचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे, याची सरकारला कल्पना आहे का?
क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले, उत्तेजकमुक्त भारत करण्यासाठी आम्ही सरकार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती, कडक नियम आणि सातत्यपूर्ण तपासणी सुरू आहे.
उत्तेजक पदार्थांचा वापर चिंताजनक
गत काही वर्षांत उत्तेजक पदार्थांच्या गैरवापराचे प्रमाण भारतीय क्रीडा क्षेत्रात चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची प्रतिमा राखण्यासाठी कडक उपाययोजना आणि खेळाडूंच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल आवश्यक असल्याचे क्रीडा तज्ञांचे मत आहे.
खेळानुसार दोषींची आकडेवारी
ॲथलेटिक्स : ७६ खेळाडू
वेटलिफ्टिंग : ४३ खेळाडू
कुस्ती : २९ खेळाडू
बॉक्सिंग : १७ खेळाडू
इतर अनेक खेळांमध्येही उत्तेजक पदार्थांचा वापर झाल्याचे उघड झाले आहे.