भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या बैठकीत निर्णय
नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) २०२३ च्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताची दावेदारी औपचारिकपणे मंजूर केली आहे. बुधवारी नवी दिल्ली येथे झालेल्या संघटनेच्या विशेष आम बैठकीत (एजीएम) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भारताने यापूर्वीच राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनासाठी स्वारस्य पत्र सादर केले होते आणि आता ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम बोली प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.
अहमदाबादसह इतर शहरांचा विचारदरम्यान, या बैठकीच्या अजेंड्यावर पुढील प्रमुख विषय होते. आर्थिक वर्ष २०२३-२४ चे लेखापरीक्षित ताळेबंद सादर करून ते मंजूर करण्यात आले. आगामी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली. २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळवण्यासाठी कॉमनवेल्थ स्पोर्ट्सकडे अधिकृतपणे दावेदारी सादर करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रियांनाही मंजुरी देण्यात आली.
या बैठकीतला आयओएच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्यासोबत गोवा ऑलिंपिक संघटनेचे खजिनदार आणि भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे संयुक्त सचिव जयेश चंद्रकांत नाईक, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे खजिनदार सहदेव यादव आणि आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या इनोव्हेशन कमिटीच्या सदस्य सबीना यादव उपस्थित होत्या.दरम्यान, या बैठकीत देशाच्या क्रीडा प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, भारताने २०२३ च्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी सादर करण्यास सर्वानुमते मंजुरी दिली आहे.
या बैठकीनंतर आयओएच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी सांगितले की, सर्व सदस्यांचे या निर्णयाला एकमत आहे आणि ही एकमताने घेतलेली भूमिका आहे. आता आम्ही पुढे तयारी सुरू करू. यजमान शहर म्हणून अहमदाबादची निश्चिती झाली आहे का, या प्रश्नावर पीटी उषा म्हणाल्या की, अहमदाबादच यजमान शहर असेल असे नाही. आपल्याकडे भुवनेश्वर आणि दिल्लीमध्येही चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.
या बैठकीत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी, विविध राज्य ऑलिंपिक संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे सदस्य उपस्थित होते. भारताने जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
‘राष्ट्रकुल’च्या आयोजनासाठी भारत सज्ज
भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता आहे, असा विश्वास भारतीय ऑलिंपिक संघटनेने व्यक्त केला. देशातील मजबूत पायाभूत सुविधा, मोठा अनुभव आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्याची वचनबद्धता यामुळे हा निर्णय घेण्यात आला. २०२३ चे राष्ट्रकुल खेळ यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
गोव्याचे सक्रिय प्रतिनिधित्व
गोव्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे, या महत्त्वाच्या बैठकीत गोव्याचे सक्रिय प्रतिनिधित्व करण्यात आले. गोवा ऑलिंपिक संघटनेचे खजिनदार आणि भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे संयुक्त सचिव जयेश चंद्रकांत नाईक यांनी या सभेत सहभाग घेतला. गोव्यातील क्रीडा विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
यजमान देशाचा अंतिम निर्णय नोव्हेंबरमध्ये
भारता व्यतिरिक्त नायजेरिया, कॅनडा आणि इतर दोन देशांनीही या स्पर्धेच्या यजमानपदासाठी रस दाखवला होता. मात्र, कॅनडाने जूनमध्येच आपले नाव मागे घेतले. राष्ट्रकुल खेळांच्या अधिकाऱ्यांच्या एका टीमने नुकताच अहमदाबादमधील प्रस्तावित ठिकाणांचा पाहणी दौरा केला होता. या महिन्याच्या अखेरीस एक मोठे प्रतिनिधी मंडळ येण्याची शक्यता आहे. २०३० च्या राष्ट्रकुल खेळांच्या यजमान देशाचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांच्या आम बैठकीत घेतला जाईल.