रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर : अव्वल १० फलंदाजांमध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश
बंगळुरू : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.
आयसीसीच्या ताज्या फलंदाजी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत गिल पहिल्या क्रमांकावर विराजमान असताना, रोहित शर्माने बाबर आझमला मागे टाकले. बाबरला एका स्थानाचे नुकसान झाल्याने तो दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील खराब कामगिरीचा फटका बाबर आझमला बसला.
दुसरीकडे, एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत श्रेयस अय्यरने पहिल्या १० खेळाडूंमध्ये आपले स्थान कायम राखले असून, तो आठव्या स्थानी आहे. यासह, अव्वल १० फलंदाजांमध्ये गिल, रोहित, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर अशा चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.
टी-२० क्रमवारीत तिलक वर्माची झेप
टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानी कायम आहे, तर तिलक वर्माने एका स्थानाची झेप घेत दुसरे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या स्थानी आला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानावर कायम असून, यशस्वी जैस्वालला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो अव्वल १० मधून बाहेर पडून ११व्या स्थानी पोहोचला आहे.
कसोटी क्रमवारीत जैस्वाल-पंत अव्वल १० मध्ये
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये, यशस्वी जैस्वाल पाचव्या तर ऋषभ पंत आठव्या स्थानावर आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल १३व्या स्थानी आहे. कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट पहिल्या, हॅरी ब्रूक दुसऱ्या, न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर आहे.
एकदिवसीय सांघिक क्रमवारीत भारत अव्वल
एकदिवसीय सांघिक क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे, तर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी आहे. न्यूझीलंड दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत श्रीलंका चौथ्या, दक्षिण आफ्रिका सहाव्या आणि इंग्लंड आठव्या स्थानी आहे. पाकिस्तानला एकदिवसीय मालिकेत पराभूत करणारा वेस्ट इंडिजचा संघ ताज्या क्रमवारीत नवव्या स्थानी पोहोचला आहे.