शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

प्रतिष्ठित पुरस्कार चौथ्यांदा जिंकणारा मानकरी

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
13th August, 12:08 am
शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याची जुलै महिन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 'पुरुष प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड केली आहे. गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला हा मान मिळाला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार चौथ्यांदा जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.
जुलै महिन्यात गिलने इंग्लंडमध्ये खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ९४.५० च्या प्रभावी सरासरीने ५६७ धावा काढल्या. या विक्रमी कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्याला जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये हा सन्मान मिळाला होता. गिलच्या या कामगिरीमुळे भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली.
बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने ४३० धावांची विक्रमी खेळी केली, ज्यात २६९ आणि १६१ धावांचा समावेश होता. त्यानंतर मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १०३ धावांची खेळी करून त्याने सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पुरस्कार मिळाल्यानंतर गिलची प्रतिक्रिया
चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाल्यानंतर गिल म्हणाला, जुलै महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड होणे खूप आनंदाची गोष्ट आहे. कर्णधार म्हणून माझ्या पहिल्याच कसोटी मालिकेतील कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाल्याने तो माझ्यासाठी विशेष आहे. दरम्यान, गिलने बर्मिंगहॅममधील द्विशतकाला अविस्मरणीय क्षण म्हटले आहे.
सोफिया डंकले ‘महिला प्लेअर ऑफ द मंथ’
इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकले हिला जुलै महिन्यासाठी 'महिला प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून गौरवण्यात आले आहे. तिने भारताविरुद्ध मायदेशात खेळलेल्या सात सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. डंकलेने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये १२६ धावा आणि चार टी-२० सामन्यांमध्ये १४४ धावा केल्या. तिने एका सामन्यात ९२ चेंडूत ८३ धावांची शानदार खेळीही केली होती.