रोहित शर्माच्या समजुतीमुळे यशस्वी जैस्वालने गोव्याचा प्रस्ताव फेटाळला
मुंबई : भारताचा युवा आघाडीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल सध्या त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे जितका चर्चेत आहे, तितकाच तो आता डोमेस्टिक क्रिकेटमधील संघबदलाच्या निर्णयामुळेही चर्चेत आला आहे. काही आठवड्यांपूर्वी यशस्वी जैस्वालने मुंबईचा संघ सोडून गोव्याच्या संघातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या समजुतीनंतर जैस्वालने हा निर्णय मागे घेतला आणि पुन्हा एकदा मुंबई संघाकडून खेळणार असल्याचे जाहीर केले.
यशस्वी जैस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते. हे प्रमाणपत्र म्हणजे खेळाडूला दुसऱ्या संघासाठी खेळण्यास मिळणारी परवानगी. गोवा क्रिकेट असोसिएशनकडून त्याला चांगली ऑफर दिली होती. या संधीमुळेच त्याने सुरुवातीला गोव्याकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारताचा दिग्गज फलंदाज आणि सध्याचा वनडे कर्णधार रोहित शर्माने जैस्वालशी संवाद साधला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, रोहितने यशस्वीला स्पष्ट शब्दांत सांगितले, मुंबईने तुला घडवले आहे. या संघाने तुला भारतासाठी खेळण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या शहराशी आणि संघाशी तुझी बांधिलकी टिकवणे गरजेचे आहे. याचा प्रभाव इतका झाला की, यशस्वीने महिन्याभरातच गोव्यात जाण्याचा विचार सोडून दिला.
यशस्वी जैस्वालने केवळ रोहित शर्माचे ऐकले नाही, तर मुंबईतील काही वरिष्ठ खेळाडूंशी देखील चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनानंतर त्याने ईमेलद्वारे एमसीएकडून घेतलेले एनओसी माघारी घेण्याची विनंती केली, जी असोसिएशनने मान्य केली.
यशस्वी जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशचा असला तरी क्रिकेटच्या स्वप्नासाठी तो लहानपणी मुंबईत आला. २०१९ मध्ये वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमधून मुंबईकडून पदार्पण केले. त्याने मुंबईकडून आतापर्यंत ७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यातून त्याने भारतीय संघात आपली जागा निर्माण केली.
गोवा क्रिकेट असोसिएशनने दिली होती मोठी संधी
गोव्याकडून खेळल्यास स्थिर स्थान, जास्त सामने आणि कर्णधारपदाची संधी मिळू शकली असती. पण रोहित शर्माच्या सल्ल्याने यशस्वीने आपला निर्णय बदलला आणि मुंबईकडूनच खेळत राहण्याचा निर्णय घेतला.