वाढीव घरपट्टी लागू न करण्याचे आवाहन
म्हापसा : पंचायत संचालनालयाने घरपट्टी करात भरमसाठ वाढ केलेली आहे. निवासी घरासाठी घरपट्टी कर हा प्रति चौ. मीटर ४० रुपये तर व्यावसायिक आस्थापनासाठी घरपट्टी कर हा प्रति चौ. मीटर २०० रुपये आहे. ही करप्रणाली लोकांना परवडणारी नसून ती पंचायतीने लागू करू नये, अशी विनंती आपण कळंगुट सरपंचांकडे केली असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.
सरकारने पंचायत संचालनालयाच्या मार्फत १० फेब्रुवारी २०२२ रोजी या वाढीव घरपट्टी करप्रणालीची अधिसूचना जारी केली होती. राज्यातील पंचायतींना हे परिपत्रक अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. रविवारी कळंगुट पंचायतीच्या ग्रामसभेत या परिपत्रकावर चर्चा होणार आहे. ग्रामसभेत ग्रामस्थ या दरवाढीला विरोध करणार आहेत. मात्र, पंचायत मंडळाने देखील परिपत्रकाची अंमलबजावणी करावी की नको याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी लोबो यांनी केली.
किनारी भागातील व्यवसायाला सध्या मंदी आली आहे. रेस्टॉरन्ट आणि गेस्ट हाऊसच्या खोल्यांमध्ये वाढ झालेली आहे. परंतु सध्या ग्राहक मिळेनासे झाल्याने दर निम्म्यावर आणावा लागला आहे. परप्रांतिय व्यवसाय सोडून जात आहेत. अशा स्थितीत जर ही वाढीव घरपट्टी लागू झाल्यास लोकांवर अतिरिक्त भार पडेल, असा दावा लोबो यांनी केला आहे.
‘डिजिटल इंडिया’ ची मागणी
सध्या जीएसटीपासून विविध कर आणि परवान्यांचे वाढीव शुल्क भरणे व्यावसायिकांना शक्य होत नाही. हे कर भरण्यासाठी व्यावसायिकांना सरकारच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे ही करप्रणाली एका छताखाली ऑनलाईनद्वारे आणावी. जेणेकरून व्यावसायिकांना फायदा होईल. तसेच सरकारने खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी लोबो यांनी केली.