पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) शिक्षण खात्यातील सहाय्यक जिल्हा निरीक्षक (एडीईआय)/ ग्रेड -१ शिक्षकांच्या १११ जागांवर भरती केली जाणार आहे. यातील ६० जागा खुल्या प्रवर्गासाठी तर ५१ जागा आरक्षित असणार आहेत. सर्व जागांसाठी आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.
एकूण जागांपैकी सर्वाधिक ११ जागा इंग्रजी विषयाच्या आहेत. यानंतर गणित विषयाच्या १०, अर्थशास्त्राच्या ९, हिंदी भौतिकशास्त्र, रसायशास्त्राच्या प्रत्येकी ८, भूगोल आणि इतिहासाच्या प्रत्येकी ७, कोकणी, मराठी आणि जीवशास्त्राच्या प्रत्येकी ६, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि सेक्रेटेरीअल प्रॅक्टिस, बुक किपिंग अँड अकाऊंटिंगच्या प्रत्येकी ५ तर बिझनेस स्टडीजच्या ४ जागांचा समावेश आहे.
सर्व पदांसाठी उमेदवार ५० टक्के किंवा अधिक गुण घेऊन पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही जागांसाठी बीएड, बीएबीएड किंवा बीएससी बीएड उत्तीर्ण असणे ग्राह्य धरले जाणार आहे. अर्जाचे शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरल्यावर अर्ज गृहीत धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे.