सुरुवातीची किंमत कोटीत
पणजी : गोवा गृहनिर्माण मंडळाने हरवळे (साखळी) आणि काणकोण येथे दोन व्यावसायिक प्लॉट्स विक्रीसाठी जाहीर केले आहेत. मात्र हे प्लॉट्स विकत घेण्यासाठी इच्छुकांना कोट्यवधींची गुंतवणूक करावी लागणार आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ३,८२८ चौ. मी. क्षेत्रफळाचा हरवळे येथील प्लॉट प्रति चौ. मी. २,५०० रुपये या दराने उपलब्ध असून, त्याची किमान बोली ९५.७० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लॉटवर १०० एफएआरपर्यंत बांधकामाची परवानगी असेल.
तर काणकोण येथील श्रीस्थळ भागातील ३,९२८ चौ. मी. क्षेत्रफळाचा दुसरा प्लॉट प्रति चौ. मी. ३,००० रुपये या दराने उपलब्ध असून, त्याची किमान बोली १.१७ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या प्लॉटवर ६० एफएआरपर्यंत बांधकाम करता येईल.
या प्लॉट्सची विक्री ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार असून, अर्जदारांनी १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान गोवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करायचे आहेत. बोली लावण्यासाठी अर्जदारांना ५,००० रुपये नोंदणी शुल्क तसेच त्यावर ९०० रुपये जीएसटी भरावी लागेल. हे शुल्क परत मिळणार नाही. सर्वाधिक बोली लावणाऱ्या अर्जदाराला हे प्लॉट्स विकले जाणार असून, गृहनिर्माण मंडळाच्या या घोषणेमुळे व्यावसायिक गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.