कोमुनिदाद जागेतील घरे अधिकृत करण्यास विरोध; मुंगूलमधील हल्ल्याने दहशतीचे वातावरण
पणजी : कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्यासाठी आणलेल्या विधेयकाला राज्यातील अनेक कोमुनिदादींकडून विरोध करण्यात आला. विधेयकाविरोधात राज्यपालांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंगूल माडेल येथे गाडी अडवून तलवार, कोयत्याने दोघांवर हल्ला करणारी धक्कादायक घटना घडली आहे. याशिवाय वादळी पावसामुळे नुकसान, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
उद्योजकाची १.८५ कोटींची फसवणूक
सांगे तालुक्यातील एका उद्योजकाला २०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून १.८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगे पोलिसांनी रोशन साल्ढाणा (४३, रा. मंगळुरू, कर्नाटक) याला अटक केली आहे.
शिंगाळे-पणसुले येथील घरातून १५ लाख रुपयांचे दागिने लंपास
काणकोण तालुक्यातील शिंगाळे-पणसुले येथील एका बंद घरातून चोरट्यांनी सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी घराच्या मालक मिखिला फर्नांडिस यांनी काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जमीन हडप प्रकरणी रॉयसन रॉड्रिग्जला अटक
बार्देश येथील हणजूण जमीन हडप प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकाने (एसआयटी) रॉयसन रॉड्रिग्ज या संशयिताला अटक केली आहे. याशिवाय आसगाव जमीन हडप प्रकरणात एसआयटीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला पंधराव्यांदा अटक केली आहे.
सोमवार
म्हादई लवादाला एका वर्षाची मुदतवाढ
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील म्हादई पाणी वाद सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या म्हादई जल लवादाला आता एका वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात लवादाला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
गुळेली येथील घरावर झाड पडल्यामुळे नुकसान
सत्तरी तालुक्यातील गुळेली-कणकिरे परिसरात वादळी वाऱ्याने सुक्तारो गावडे यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र, वाळपई अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे मालमत्ता वाचवण्यात यश आले.
राय उपसरपंचांवर अविश्वास ठराव संमत
राय उपसरपंच मॅन्युएल रॉड्रिग्ज यांच्याविरोधात अविश्वास ठराव सहा पंचांनी सादर केला होता. त्यावर खास बैठकीत सहा विरुद्ध पाच मतांनी हा अविश्वास ठराव संमत झाला. त्यामुळे रॉड्रिग्ज यांना पद सोडावे लागले.
वन ग्रामस्थांचा सर्वेक्षणाला विरोध
मये मतदारसंघातील वनमावळींगे कुडचिरे पंचायत क्षेत्रातील वन गावात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डिचोलीचे मामलेदार, तलाठी व टीम पोलीस फाट्यासह काही ठिकाणी घरांच्या सर्वेक्षणासाठी सोमवारी आली होती. ग्रामस्थ तातडीने संघटित झाले व त्यांनी सर्वेक्षणास आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारून भू सर्वेक्षणास विरोध केला. अधिकाऱ्यांना तिथून परत पाठवून दिले.
मंगळवार
मुंगूल माडेल येथे दोघांवर प्राणघातक हल्ला
मुंगूल माडेल येथे गाडी अडवून तलवार, कोयत्याने दोघांवर हल्ला करण्यात आला. दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे समजते. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांची निर्मिती करून तपास करण्यात आला. पाच संशयितांविरोधात लुकआउट नोटीस काढली होती. काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून कृती दल
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर गोवा सरकारने भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी कृती दल स्थापन केले आहे. पशुसंवर्धन खात्याचे उपसंचालक डॉ. नितीन नायक हे कृती दलाचे अध्यक्ष आहेत.
डिचोलीतील एकाला ४.६८ लाखांचा गंडा
गुंतवणुकीतून जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन डिचोली येथील एका रहिवाशाला ४.६८ लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार
मुंगूल हल्ला, गोळीबार प्रकरणी आठ जणांना अटक
मुंगूल फातोर्डा येथील हल्ला आणि गोळीबारच्या घटनेत फातोर्डा पोलिसांनी याआधी तिघांना अटक केली होती. आता आणखी पाच जणांना अटक केली आहे. सर्व आठही संशयितांना मडगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी वाळू उपसा रोखावा : न्यायालय
गोव्यातील बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी केवळ न्यायालयासमोरच नव्हे, तर राज्याप्रतीही जबाबदारीने आणि उत्तरदायित्व ओळखून काम करावे. सरकारी अधिकाऱ्यांनीच बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या वाळू उपशावर अंकुश ठेवावा, असे स्पष्ट निर्देश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार
सावंतवाडी येथील एका २२ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी नानोडा येथील १८ वर्षीय युवकाला अटक केली. डिचोली पोलिसांनी शून्य एफआयआर नोंद करून हे प्रकरण नोंद केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
गुरुवार
‘एसटी’ प्रतिनिधीत्व विधेयक २०२४ला राष्ट्रपतींची मंजुरी
गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींच्या (एसटी) आरक्षणाची तरतूद असलेले ‘गोवा विधानसभा अनुसूचित जमाती प्रतिनिधित्व विधेयक २०२४’ संसदेत मंजूर झाले आहे आणि आता त्याला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून, तो आता अधिकृतपणे अस्तित्वात आला आहे.
कोमुनिदादसह सरकारी जागेवरील ८० टक्के अनधिकृत घरे गोमंतकीयांची : मुख्यमंत्री
कोमुनिदादीसह सरकारी जागेवरील ८० टक्के घरे गोमंतकीयांचीच आहेत. कोमुनिदादने परवानगी दिल्यासच घरे अधिकृत होतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
कोमुनिनाद जागेतील घरे अधिकृत करण्यास विरोध
कोमुनिदाद जमिनीतील घरे व बांधकामे अधिकृत करणाऱ्या विधेयकाला राज्यातील बहुसंख्य कोमुनिदादींच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी विरोध सुरू केला आहे. विधेयकाविरोधात राज्यपालांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
शुक्रवार
मुंगूल हल्ला प्रकरणी जॉयस्टनला अटक
मुंगूल हल्ला प्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून जॉयस्टन फर्नांडिस (२०) याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही दहावी अटक असून, पर्वरी पोलिसांनी नेरुल येथून त्याला ताब्यात घेतले होते. सोबत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली.
हळर्ण येथील श्री वेताळ मंदिरात चोरी
हळर्ण येथील श्री वेताळ मंदिरात चोरट्याने फंडपेटी फोडून पैसे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. निळ्या रंगाचा रेनकोट घातलेला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
उत्तर प्रदेशातील युवकाचा मृतदेह सापडला
आशिष कुमार झा (२५, रा. वझरी, मूळ उत्तर प्रदेश) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पिर्णा-नादोडा मार्गाच्या कडेला झाडीत आढळला असून, स्वयंअपघातात मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तो ७ ऑगस्ट रोजी वझरी ते पिर्णा मार्गे नादोडाकडे जाताना बेपत्ता झाला होता.
शनिवार
पाटकर यांनी मारहाण केल्याचा आरोप
कॉंग्रेस प्रदेशाधक्ष अमित पाटकर यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप एनएसयुआयचे गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केला आहे. एनएसयुआयच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून पाटकर यांनी आपल्याला शिव्या देऊन मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
मुंगूल गँगवॉर प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक
मुंगूल येथील हल्ला व गोळीबारप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून जॉयस्टन फर्नांडिस (२०) याच्यानंतर संशयित अक्षय तलवार, इम्रान बेपारी, अविनाश गुंजीकर, परशुराम राठोड, दीपक कट्टिमणी यांना अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे. अजूनही काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.
लक्षवेधी
आगाळी फातोर्डा येथे पत्त्यांचा जुगार खेळणार्या तिघा संशयितांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७५४० रुपये व पत्ते जप्त करण्यात आले. प्रतिबंधात्मक अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
सावळे पिळर्ण येथे ऑडिट भवनजवळ झालेल्या रेहबर खुर्शिद अली खान (२२, मूळ उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणातील १० आरोपींवर मेरशी पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोप निश्चितीचा आदेश दिला आहे. तर, संदेश श्याम नाईक (२७, रा. काकोडा, सावर्डे) याची निर्दोष मुक्तता केली आहे.
नागाळी-दोनापावला येथील क्रिकेट मैदानाजवळ पणजी पोलिसांनी छापा टाकून रतनकुमार प्रधान (३६, ओडिशा) या संशयिताला अटक केली. त्याच्याकडून ९७ हजार रुपये किमतीचा ९७० ग्रॅम गांजा जप्त केला.
कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्यासाठी आणलेल्या विधेयकाला विरोध करणारी करंबोळी ही पहिली कोमुनिदाद ठरली आहे. अध्यक्ष वेन्झी व्हिएगस यांनी इतर कोमुनिदादींना याच मार्गाने पुढे येण्याचे आवाहन केले. पणजी येथे झालेल्या करंबोळी कोमुनिदादच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.