पणजी : अमित पाटकरांवर मारहाणीचा आरोप ; पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th August, 03:49 pm
पणजी : अमित पाटकरांवर मारहाणीचा आरोप ; पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी १४ ऑगस्ट रोजी येथील काँग्रेस भवनाच्या दारात आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप एनएसयुआयचे गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी पत्र लिहून पाटकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास पोलिसात तक्रार करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.

नौशाद चौधरी यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण १४ ऑगस्ट रोजी वोट चोरी विरोधात मेणबत्ती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पणजीतील काँग्रेस हाऊस मध्ये आलो होतो. यावेळी माझ्या सोबत एनएसयुआयच्या गोवा प्रभारी वैष्णवी भारद्वाज या देखील होत्या. काँग्रेस हाऊसच्या पायऱ्यांवर माझी आणि पाटकर यांची भेट झाली. पाटकर यांनी अचानकपणे माझ्यावर ओरडायला सुरुवात केली.

त्यांनी तुम्ही तुमच्या कार्यक्रमांना मला का बोलवत नाही ? एनएसयुआयचे गोवा प्रभारी गोव्यात आल्याचे मला का सांगितले नाही ? असे प्रश्न विचारणे सुरू केले. मी त्यांना, तुम्हाला अनेकदा फोन केल्याचे मात्र तुम्ही ते उचलले नसल्याचे सांगितले. यावर पाटकर यांनी चिडून मला पायऱ्यांवरून धक्का मारला आणि माझ्या अंगावर धावून आले. माझ्या शर्टची कॉलर पकडून त्यांनी मला कोकणीमध्ये शिवीगाळ केली. तू मला ओळखत नाहीस, मी काहीही करू शकतो, तुला म्हापसामध्ये येऊन दाखवतो असे ते म्हणाले.

हा प्रकार वैष्णवी भारद्वाज तसेच गोवा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. श्रीनिवास खलप यांच्या समोर घडला होता. पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून असला प्रकार घडणे अक्ष्यम आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल खचत असून पक्षाची बदनामी देखील होत आहे. पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाटकर यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असे पत्रात म्हटले आहे.