पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही आणि शिक्का वापरुन एकाला बनावट उत्पन्न दाखला उपलब्ध करून दिल्याबद्दल सात महिन्यांपूर्वी त्यांना अटक झाली होती.
पणजी : फोंडा नगरपालिकेच्या हद्दीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये पाणी व वीज जोडणीसाठी पालिकेच्या नावे बनावट एनओसी जारी झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात फोंडा पोलिसांनी शुक्रवारी पालिकेचे नगरसेवक शिवानंद सावंत यांना अटक केली. ही घटना समोर आल्यानंतर पालिकेत मोठी खळबळ उडाली असून, हे बनावट कागदपत्रांचे दुसरे प्रकरण असल्याचे उघड झाले आहे.
सिल्वानगर येथील रहिवासी रोजी मार्था रेगो यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. रेगो यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूने वीज व पाणी जोडणी घेतली होती. मात्र, त्यासाठी स्वतः रेगो यांनी अर्ज केलेला नसतानाही त्या भाडेकरूने बनावट कागदपत्रे वापरून हे कनेक्शन मिळवले असल्याचे समोर आले. त्यानंतर रेगो यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवली आणि पालिकेकडे तक्रार केली. पालिकेच्या तपासात या अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या कागदपत्रांवर नगरपालिकेचे अभियंता उदय देसाई यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या प्रकरणात नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी पालिकेच्या वतीने तपास सुरू करण्याची घोषणा केली होती. पोलीस चौकशीत या बनावट एनओसी प्रकरणात नगरसेवक शिवानंद सावंत यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
नगरसेवक शिवानंद सावंत यांना यापूर्वी ९ जानेवारी रोजीही अटक झाली होती. त्यावेळी त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांच्या बनावट सहीचा वापर करून फोंडा येथील एकासाठी खोटा उत्पन्न दाखला उपलब्ध करून दिला होता. हे प्रकरणही प्रकाशात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. फोंडा पालिकेत सतत उघड होत असलेल्या या बनावट कागदपत्रांच्या प्रकारांमुळे प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे.पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष वेळीप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.