शैक्षणिक ताणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या : युरी आलेमाव

गोव्यात तीन वर्षांत नऊ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
शैक्षणिक ताणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या : युरी आलेमाव

पणजी : अभ्यासाच्या वाढत्या दडपणामुळे गेल्या तीन वर्षांत गोव्यात नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा आणि या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
बिट्स पिलानी इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना आलेमाव म्हणाले, गेल्या दोन वर्षांत या संस्थेतील ही चौथी घटना आहे. याशिवाय, बोर्डाच्या परीक्षेचा ताण किंवा कमी गुणांमुळे नैराश्य आल्याने राज्यात आणखी पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
केवळ गुणांसाठी आणि दबावामुळे आपण आपल्या तरुण पिढीला गमावू शकत नाही. सरकारने तातडीने कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. उच्च शिक्षणाचे संचालक, जे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी राष्ट्रीय कार्यगटाचे राज्य नोडल अधिकारी आहेत, त्यांनी या गंभीर विषयावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आलेमाव यांनी केली.
सरकारने त्वरित कार्यवाही करावी
आलेमाव म्हणाले की, या प्रकरणांची चौकशी सुरू असली तरी, संस्था आणि सरकारने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. आम्हाला विद्यार्थ्यांकडून आत्महत्यांची नेमकी कारणे जाणून घ्यायची आहेत. अभ्यासक्रम खूप कठीण आहे का, किंवा त्यांच्यावर कुटुंबीय, नातेवाईक किंवा शिक्षकांकडून काही दबाव आहे का, हे तपासले पाहिजे.