सुरावली, आझादनगरीतील मतदारांची पडताळणी सुरू
मडगाव : दक्षिण गोव्यातील सुरावली आणि मडगावमधील आझादनगरीत बोगस मतदार असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेल्या दाव्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी मामलेदारांना याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुरावलीतील १०० मतदारांची चौकशी
अॅड. राधाराव ग्रॅसिअस यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरावली येथील दोन घर क्रमांकावर १०० हून अधिक मतदारांची नोंद असून त्यातील बहुतांश परप्रांतीय असल्याचा आरोप केला होता. यानंतर लगेचच मामलेदारांनी प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. ही पाहणी पूर्ण झाली असून, पुढील आठवड्यात यासंदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाईल. या पाहणीत मतदारांची पार्श्वभूमी आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील तपशील यांची पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे एकच मतदार दोन राज्यांमध्ये नोंदणीकृत आहे का, याचीही माहिती समोर येईल.
आझादनगरीतील ८६८ मतदारांची पडताळणी
साविओ कुतिन्हो यांनीही आझादनगरीत १२० घरांची नोंद असताना मतदारयादीत २८० हून जास्त घरे आणि ८६८ नोंदणीकृत मतदार असल्याचा दावा केला होता. या दाव्याचीही जिल्हा प्रशासन पडताळणी करत आहे. प्राथमिक तपासणीनुसार, मतदारयादीतील ही वाढ २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, ठोस पुराव्याशिवाय या मतदारांना बोगस म्हणता येणार नाही, त्यामुळे संपूर्ण पाहणी अहवालाची प्रतीक्षा आहे.