गुंतवणुकीला प्रोत्साहन, रोजगार निर्मितीवर भर
पणजी : राज्याच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पणजी येथील जुन्या सचिवालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिरंगा फडकवून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. गोवा सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असून राज्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात सरकार प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी गोव्याचा आर्थिक विकास मोठ्या उद्योगांवर अवलंबून असल्याचे सांगितले. त्यामुळे रोजगार निर्माण करणाऱ्या हरित उद्योगांना राज्यात आणण्यासाठी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून सरकार अनुकूल वातावरण निर्माण करेल. 'डबल इंजिन' सरकारमुळे आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये मजबूत पायाभूत सुविधा विकसित करणे शक्य झाले आहे.वर्षानुवर्षे जमिनीच्या हक्कापासून वंचित असलेल्या गोव्यातील अनुसूचित जमाती समुदायाला सरकारने आता जमिनीचे हक्क मंजूर केले आहेत. याशिवाय, राज्याच्या विकासातील योगदानाबद्दल सरकारी कार्यालयांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्पुरता दर्जा देऊन विशेष वेतनवाढ देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लोकांना प्रशासकीय सेवा त्यांच्या दाराशी मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गोव्यातील लोकांच्या आशा-आकांक्षा विकसित भारताचा पाया रचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्यातील १३ आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच, 'गोवा मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप' धोरणांतर्गत २७ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रपती पोलीस पदकांचे मानकरी, अग्निशमन सेवा पदक विजेते आणि विविध सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, तसेच इतर मंत्री, अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विस्तार
शिक्षणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत मुख्यमंत्र्यांनी कुजिरा शाळेच्या धर्तीवर मडगाव येथेही शाळा संकुल उभारण्याची योजना असल्याचे सांगितले. गोवा विद्यापीठाला 'ए+ नॅक' मान्यता मिळाली असून, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, ललित कला महाविद्यालय, गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स, गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि गोवा कॉलेज ऑफ म्युझिक यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांसाठी विद्यापीठाच्या परिसरात जागा देण्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे.