गोव्याच्या मुलांच्या संघला विजेतेपद, मुलींना उपविजेतेपद

दिल्लीतील राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
20th August, 11:38 pm
गोव्याच्या मुलांच्या संघला विजेतेपद, मुलींना उपविजेतेपद

नवी दिल्ली : दिल्लीतील कर्नलसिंह स्टेडियम येथे १८ ते २० ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या १०व्या मिनी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या मुलांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. तर गोव्याच्या मुलींनी अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवले.
ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या गटात तब्बल ३२ संघ तर मुलींच्या गटात १८ संघ सहभागी झाले होते.
प्री-क्वार्टर फायनलमध्ये गोव्याने विदर्भचा १५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गोव्याने ६ षटकांत ३० धावा केल्या. वेदांत गावसने ७ धावा, आर्यन मुरगावरने १० धावा केल्या. विदर्भाचा डाव १४ धावांत ५ गडी गमावून संपला. नितिक कन्नूरने २ बळी, वेदांत गावसने १ बळी, प्रफुल नाईकने २ बळी घेतले.
क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशच्या विरोधात गोव्याने ५.३ षटकांत ३२ धावा करत सामना जिंकला. पहिल्यांदा फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने ३० धावा केल्या. गोव्यातर्फे वेदांत गावसने ४ धावांत २ बळी, अयान महापुळेने १० धावांत २ बळी घेतले.
फलंदाजी करताना अनिश यादवने नाबाद १२ धावा, तर आर्यन मुरगावकरने नाबाद ११ धावा केल्या.
सेमी फायनलमध्ये गोव्याने बिहारचा ५ गडी राखून पराभव केला. बिहारने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ४४ धावा केल्या. नितिक कन्नूरने ७ धावांत १ बळी घेतला, गोव्याने ५.४ षटकांत ४५ धावा केल्या. अनिश यादवने नाबाद २४ धावा, तर अयान महापुळेने नाबाद ११ धावा केल्या. गोव्याने सामना ५ गडी राखून जिंकला.
अतिम सामना गोवा विरुद्ध वेस्टर्न यूपी यांच्यात झाला. वेस्टर्न यूपीने ६ षटकांत ७ गडी बाद ३९ धावा केल्या. वेदांत गावसने ११ धावांत २ बळी, प्रफुल नाईकने ८ धावांत ३ बळी घेतले. गोव्याने ५.३ षटकांत ४० धावा करत चषकावर नाव कोरले. आर्यन मुरगावकरने नाबाद १६ धावा, तर अनिश यादव नाबाद ९ धावा केल्या. गोव्याने अंतिम सामना ६ गडी राखून जिंकला.
मुलींचा तमिळनाडूविरुद्ध पराभव
मुलींच्या अंतिम सामन्यात गोव्याच्या संघानेही उत्कृष्ट खेळ दाखवला, मात्र त्यांना तमिळनाडूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे गोवा मुलींना **उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले