आयुष्य म्हणजे काय?

आयुष्य म्हणजे सतत राग, द्वेष, अहंकार आणि कुरघोडीने जगणं आहे का? काय ते प्रेम, सहवेदना, आपुलकी, करुणा आणि इतर असंख्य सुंदर भावनांनी जगण्याची एक संधी आहे?

Story: मनातलं |
just now
आयुष्य म्हणजे काय?

कधी कधी जेव्हा एखाद्या तरुण, 

हसतमुख आणि उत्साही व्यक्तीचं अचानक निधन झाल्याचं ऐकतो, तेव्हा आतून हादरून जातो. अशा घटना आपल्याला अस्वस्थ करून जातात. आपल्या समोर अनेक प्रश्न उभे करतात—ज्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात. का घडलं असं? इतकं लवकर का?

अनेकदा आपण ऐकतो, "जेव्हा जिवंत असाल, तेव्हा आपल्या माणसांबरोबर जगा." पण या ओळीचा खरा अर्थ आपल्याला तेव्हाच उमजतो, जेव्हा आपण कोणीतरी आपले असलेली, जीवापाड प्रेम केलेली व्यक्ती गमावतो. जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून जाते आणि मागे राहतात त्या केवळ आठवणी.

काम, करिअर, यश या सगळ्यांचं आयुष्यात स्थान आहे. पण जेव्हा एखादं माणूस निघून जातं, तेव्हा कुठलंच यश, कुठलीच संपत्ती किंवा प्रसिद्धी त्या व्यक्तीला परत आणू शकत नाही. तेव्हा कळतं की खरी मोलाची गोष्ट म्हणजे त्यांचं अस्तित्व, त्यांचं आपल्यावरचं प्रेम आणि त्यांनी आपल्या आयुष्यात भरलेले रंग.

ही जाणीव माझ्या आध्यात्मिक प्रवासात अधिक गहिर झाली आहे. लहान वयातच मला योग्य मार्ग दाखवणाऱ्या माझ्या गुरुंचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला शिकवलं की माणूस असणं म्हणजे केवळ जगणं नाही, तर इतरांच्या भावना ओळखणं, त्यांचं दु:ख समजून घेणं आणि त्यांच्या वेदनेत 

सहभागी होणं.

माझ्या गुरुंमुळेच मला समजलं की खरं माणूसपण म्हणजे संवेदनशीलता. दुसऱ्यांच्या वेदना ओळखणं आणि त्यांना आधार देणं हीच खरी माणुसकी.

आपलं जीवन केवळ स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही जगावं. प्रेम, माफ करणं, दयाळूपणा या भावना कोमल वाटतात, पण त्यांचं सामर्थ्य प्रचंड असतं. त्या जखमा भरून काढतात, नात्यांना जोडतात आणि अंधारात प्रकाश दाखवतात.

म्हणूनच आज जर कोणी मला विचारलं, "आयुष्य म्हणजे काय?"

तर मी मोठ्या मनाने म्हणेन:

आयुष्य म्हणजे—

एखाद्याला मनापासून प्रेम करणं, मनापासून माफ करणं, आपल्या माणसांना जवळ घेणं, मृदू बोलणं, शांतपणे वागणं आणि समजून घेणं.

आजच जगावं, पूर्णत्वाने. कारण उद्या आपल्याकडे नसेलही.

आणि सर्वात महत्त्वाचं - आयुष्य हे एक सुंदर देणं आहे. ते व्यर्थ घालवू नका.


- पुजा नाईक

केपे