कमलाच्या कुटुंबाने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांनी ती म्हापश्याच्या एका मंदिराबाहेर भिकारीणसारख्या अवस्थेत सापडली. घरचे तिला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला तयार होते. पण तिच्या मोठ्या बहिणीने कमलाला आपल्यापाशी ठेवण्याचा निर्णय घेतला.
कधी कधी प्रसंग असे येतात की खरं काय व खोटं काय याचा आपण भेदच करू शकत नाही. जीवनात असा प्रसंग आल्यावर माणूस गोंधळून जातो व बाकीचे लोक त्यालाच मूर्ख, वेडा अशी नावे ठेवतात. असाच प्रसंग कमलाच्या जीवनात दहा वर्षांपूर्वी घडला होता. सगळेजण तिला वेडी म्हणून वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा असे सांगत होते. पण सुदैवाने तिच्या बहिणीने तिला आपल्या घरी आणले व सावरले, सांभाळले. पण कमलाच्या प्रसंगात तिची काहीच चूक नव्हती. चूक होती ती नियतीची.
कमला ही मूळ म्हापसा शहरातील मुलगी. चार बहिणी व दोन भावांची सर्वात छोटी असलेली कमला ही सातवी मुलगी. घरातील कामे, भावंडांची मुले, आई-वडिलांची सेवा यातच तिचा दिवस जाई. सर्व भावंडांची लग्ने होता होता कमलाची कधी पस्तीशी ओलांडली कळलेच नाही. कमला सावळी व अंगाने बारीक काठीप्रमाणे होती. तिला अनेक स्थळे येत पण एकही मनाप्रमाणे भेटत नसे.
अशाच एका रविवारी तिला पहायला चोडणहून स्थळ आले. भेटण्याचे ठिकाण बोडगेश्वराच्या देवळात होते. सासऱ्यांचे चोडण फेरी मार्गाकडे दुकान होते. नवरा टॅक्सी ड्रायव्हर होता, दिसायलाही गोरा व चांगला दिसत होता. वय वाढत असल्यामुळे जास्त महिने न थांबता पटापट लग्न उरकण्यात आले. लग्न करून कमला घरात आली पण तिला कोणीतरी आपल्या मागेमागे फिरत आहे असे नेहमी वाटत असे. पहिले पाच दिवस तिला काही वाटले नाही कारण सगळे घरात होते. घर पण मोठे होते. सासू सकाळी स्वयंपाक करून सासऱ्यांबरोबर दुकानात जाई. नवरा सुरेश टॅक्सी घेऊन सकाळी जाऊन रात्री घरी येई. कमलाला खूप एकटेपणा वाटत असे. सुरेश तिला जवळ घेत नसे, तिच्या कामात नेहमी चूक काढली जाई. 'तू आवडत नाहीस मला. तू दूर रहा माझ्यापासून' असेच सुरेशने तिला बजावले होते.
कमलाला रात्री पण विचित्र स्वप्ने पडत व झोप लागत नसे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तर त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये आगीने पेट घेतला. हे सर्व संकेत होते पण तिला ते कळत नव्हते. याचाही दोष कमलावर लागला पण ती गप्पच राहिली. कमला श्रीकृष्णाची भक्ती करी व रोज गीतेचे अध्ययन करी. लग्नाला आठच दिवस झाले होते. कमलाचे मंगळसूत्र तुटले. त्यावरून सगळे रागावले. सुरेशने तर तिच्यावर हात पण उचलला. कमला कधीही फुले माळायची, ती लगेच काळी पडायची. देव्हाऱ्यातील लाल कुंकू पण काळे पडायचे. कमलाने घडणारे प्रकार सुरेशला सांगण्याचा प्रयत्न केला पण तो तिलाच रागाने मारहाण करी. सुख तिच्या नशिबी नव्हतेच. ती खूपच एकटी पडली होती. तिला आतून खूप गुदमरायला होत होते. फक्त तिला आधार होता कृष्णाचा. गीता वाचल्यावर तिला निवांत वाटे. पण एक दिवस अचानक गीतेच्या पुस्तकाने पेट घेतला व जळून खाक झाले. आता ती खूप घाबरायची. सकाळ ते संध्याकाळ ती तुळशी वृंदावनापाशीच बसून काढायची. पलंगावर झोपल्यावर कोणीतरी आपला गळा दाबत आहे असेच तिला वाटायचे. बेडरूममध्ये गेल्यावर तिला खूप नकारात्मकता वाटायची. तिच्या स्वप्नात जळता पलंग व एक बाई तिला दिसायची पण स्वप्न म्हणून ती दुर्लक्ष करायची.
सासरच्यांना कमलाचे हे वागणे वेडेपणच वाटायचे. एकदा तर हद्दच झाली. तिचे स्वप्न तिला खरेच बेडरूममध्ये दिसू लागले. पलंग पेट घेत होता, एक बाई पलंगावर जळत होती. कमला घाबरली. तिने सुरेशला सांगितले पण सुरेशने तिचीच मारझोड केली. कमला आता बेडरूममध्ये जायला घाबरायची कारण तिला जळता पलंग, जळती बाई दिसत असे. कमलाने घरातून पळून जाण्याचे ठरवले पण म्हाताऱ्या आई-वडिलांचा विचार करून ती गप्प राहिली. कमला खूप वैतागली होती. सासू-सासरे तिला वेडी म्हणून हिणवत होते.
एके दिवशी कमलाने 'जीव जातो तर जाऊ दे' म्हणून धाडस करण्याचे ठरवले. घरात ती एकटीच होती. आज ती न घाबरता बेडरूममध्ये गेली. तिला ते दृश्य परत दिसायला सुरुवात झाली. पलंग जळू लागला. तिला ती बाई जळताना दिसू लागली. कमला घाबरली होतीच पण तिला आज जीवाची पर्वा नव्हती. ती मोठ्याने ओरडली, "कोण आहेस तू? का दिसतेस मला तू? का सतावतेस मलाच?" आता ती त्या आगीच्या ज्वालांमधूनच बोलत होती. "कारण, कारण माझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहेस तू. प्रेमविवाह केलेला सुरेशशी मी, चार महिन्याचे बाळ होते पोटात माझ्या. आमच्या प्रेमाचे प्रतीक चार महिन्यांवर लिंग चाचणी केल्यावर मुलगी पोटात आहे म्हणून तुझ्या सासू-सासऱ्यांनी याच पलंगावर बांधून जाळले मला. काय चूक होती माझी? माझ्या मुलाची? सैतान आहेत ते. जा तू इथून. तुला पण मारणार ते." हे ऐकून कमलाला जणू धक्काच बसला. सुरेशच्या कुटुंबाने आपल्याला फसवले होते. ती एका मृगजळात फसल्यागत होती. कमला अस्वस्थ झाली होती. तिला काय करावे हे सुचेना. ती तशीच रस्त्यावर सैरावैरा पळू लागली. कमलाच्या कुटुंबाने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांनी ती म्हापसाच्या एका मंदिराबाहेर भिकारीणसारख्या अवस्थेत सापडली. घरचे तिला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला तयार होते. पण तिच्या मोठ्या बहिणीने कमलाला आपल्यापाशी ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर व देवाच्या मदतीने एका वर्षानंतर कमला पूर्णपणे सावरली होती. कमलाच्या बहिणीने सुरेशला समजावले व कमलाला परत त्या घरात न येण्याची अट घातली. विचारपूस केल्यावर सुरेशची पहिली बायको मेल्याची घटना खरी होती हे सत्य उघड झाले होते. सुरेशने भाड्याने म्हापसा इथे फ्लॅट घेतला व कमलाबरोबर नव्या संसाराची सुरुवात केली. चार वर्षांपूर्वी सुरेशचे चोडणचे घर आगीत जळून खाक झाले व त्यात त्याचे आई-वडील पण वारले. कर्माचे फळ कर्त्याला मिळाले. आज कमला व सुरेशला तीन वर्षांचा मुलगा आहे व कमला आपल्या राजाराणीच्या संसारात सुखाने नांदत आहे.