स्त्री: अद्‌भुत सृजनशक्ती

स्त्री ही केवळ अबला नसून सृष्टीचा विस्तार करणारी अद्‌भुत शक्ती आहे. सकारात्मक संकल्प आणि अंगभूत गुणांच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करणारा हा विशेष लेख.

Story: विशेष |
06th March, 10:21 pm
स्त्री: अद्‌भुत सृजनशक्ती

​​८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवसामागचा उद्देश प्रत्येक स्त्रीला तिचा मान, तिची प्रतिष्ठा, तिचा सन्मान आणि तिचा हक्क मिळवून देणे हा असतो. समाजात स्त्री-पुरुष समानता उदयास यावी, महिलांना मतदानाचा समान हक्क मिळावा, तसेच त्यांच्या अतिरिक्त कामाचे तास कमी करून त्यांना कामाचा योग्य मोबदला दिला जावा, अशा विविध हेतूंखातर महिलांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हा दिवस जाहीर झाला.

​आजचा हा लेख नेहमीसारखा 'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी' या मथळ्याखाली तेच दुःख मांडण्यासाठी नाही, याची खबरदारी मी घेतलेली आहे. आज आपण स्त्री या रचनेची उजळ, प्रबळ, प्रखर आणि ज्वलंत ऊर्जावंत बाजू मांडूया. असं म्हटलंच आहे की, दृढ मनाने संकल्प केल्याने ते नक्कीच सिद्ध होतात. मग आपलं लिखाण जर दुःखी, भाबड्या आणि हतबल अबला स्त्रीच्या संकल्पनेतून साकार झाले, तर तोच नकारात्मक संकल्प सिद्ध होऊ शकतो; म्हणूनच आज नकारात्मकता दूर सारून सकारात्मक बाजू मांडू.

​'संकल्प से सिद्धी' ही जादू नसून हे विज्ञान असल्याचे सिद्ध झाले आहे आणि याचा प्रत्यय मला खूपदा आला आहे. स्त्री हे शक्तीचे दुसरे नाव आहे. ती अद्‌भुत आहे. अगदी तन्मयतेने कुठलीही गोष्ट करण्याचे जेव्हा ती निश्चित करते, तेव्हा ती गोष्ट अचूक घडून येतेच, हीच तिची शक्ती आहे.

​'स्त्री' म्हणजे संपूर्ण सृष्टीचा विस्तार करणारी शक्ती! स्त्रीपासून सृष्टीची निर्मिती झाली यात दुमत नाही. इवल्याशा गर्भाला आपल्या उदरात सामावून नऊ महिन्यांच्या काळात ती त्या जीवावर संस्कार घडवते; त्याला या जगात येण्यासाठी समृद्ध बनवते. तिच्या उदरातील ऊर्जा घेऊन ते बाळ या जगात पाऊल ठेवते आणि एका नव्या पिढीची सुरुवात होते. अशा उदरात केवढी शक्ती सामावलेली असेल, याचा प्रत्यय त्या मातेशिवाय जगात कोणीच अनुभवू शकणार नाही. हीच तिला भगवंताने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.

​तिच्या शरीराची रचना करणाऱ्या त्या विश्वविधात्याच्या मनात काय आले असेल, जे त्याने असे अद्‌भुत शरीर तयार केले? कला, कारुण्य, ममता, त्रागा, क्रोध, संवेदनशीलता, समजूतदारपणा, संयम, चिकाटी, कणखरपणा, सोज्वळता, सौम्यता, कठोरता, सोशिकता, विभिन्न कला, जिद्द, द्वेष आणि लाघवी चंचलता; किती किती भावभावनांचा ठेवा या शरीराला त्या सृष्टीरचित्याने प्रदान केला! एकाच वेळी असंख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करून ते प्रत्येक कार्य तडीस नेण्याची जादुई शक्ती, ज्याला आपण 'Multitasking' म्हणून संबोधतो, ती तिच्यात आहे. सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणे आणि व्यवस्थापन नीट समजून घेणे ही सुंदर कला तिच्या अंगभूत आहे.

​महिला कितीही आधुनिक असली तरीही आजदेखील ती स्वतःला शेवटी ठेवून स्वतःशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याला प्राधान्य देतेच. कोणत्याही बिकट परिस्थितीत पुन्हा उठून उभे राहण्याचे सामर्थ्य तिच्याकडे असते. जिथे ती प्रेमाचा सागर असते, तिथेच महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कणखरपणे लढा देणारी पराक्रमी लढवय्याही असते. घोरपडीची जिद्द तिला आईच्या नाळेतूनच मिळालेली असते. उदरातून एक इवलासा जीव या जगात आणताना ज्या प्रसूतीवेदना स्त्री सोसते, त्याची प्रखरता शब्दात व्यक्त करणे कोणत्याही लेखणीला जमलेले नाही आणि कधी जमणारही नाही. स्वर्ग स्पर्शून पुन्हा भूमीवर जिवंत येणे काय असते, याचा प्रत्यय फक्त त्या मातेने घेतलेला असतो; परंतु प्रसूतीनंतर ती वेदना ती स्वतःही मांडू शकत नाही, अशी विचित्र पण अद्‌भुत रचना तिची भगवंताने केलेली आहे.

​विस्कटलेल्या नात्यांना हळुवारपणे प्रेमाची फुंकर घालून संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची कला, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर निर्भय, निडर आणि प्रतिभाशाली होऊन असंख्य जबाबदाऱ्या सहजतेने पेलणारी 'स्त्री' ही साधारण असूच शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना, 'Women are Incredible'... महिला अद्‌भुत आहेत.

​स्वतः परमेश्वर जिला बनवून स्वतःच आश्चर्यचकित झाला असेल की, मी हे काय बनवलंय? तर मग माणसाची अवस्था काय असेल! आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात केवळ कार्यरतच नाही, तर यशवंत आहे. ज्या ज्या ठिकाणी तिचे अस्तित्व असते, तिथे आपसूकच शिस्त, जिद्द आणि चिकाटी या सगुणांचा संचार वाढतो. ज्या प्रत्येक क्षेत्रात कधी स्त्री पोहोचण्याचा विचारही केला नसावा, तिथे आज ती अव्वल स्थानी आहे. उदाहरणे सांगायची झाल्यास, सफाई कामगारापासून पेट्रोल पंपावरील कर्मचारी, भाजीवालीपासून स्वतंत्र दालने चालवणारी उद्योजिका आणि रिक्षाचालकापर्यंत सर्वत्र ती दिसते. शास्त्रज्ञ, क्रीडा, वैमानिक, वैद्यकीय, राजकारण, संरक्षण दल अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने पुरुषाला बरोबरीची टक्कर दिली आहे.

​माझ्या ऑफीसमध्ये सफाई काम करणारी ताई, तिला मी स्त्रीशक्तीचा आदर्श समजते. पूर्ण हतबल अवस्थेत देखील तिने आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. तिच्याकडे आर्थिक स्थैर्य नव्हते, पण चिकाटी व खंबीरपणा होता. कधीकाळी दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलेली हीच स्त्री, फक्त जबाबदारीपोटी पुन्हा खंबीरपणे उभी राहिली आणि आज कित्येकींचा आदर्श बनली आहे.

​या वर्षीचा जागतिक महिला दिन हा 'Give to gain' या विषयावर आधारित आहे; म्हणजेच 'द्या आणि घ्या'. आपण प्रेम, प्रोत्साहन आणि सकारात्मक ऊर्जा द्याल तर त्याच गोष्टी दुप्पट पटीने आपल्याकडे परत येतील. दोन स्त्रिया चांगल्या मैत्रिणी बनून राहिल्या, तर त्यातून जी सकारात्मकता निर्माण होईल, ती संपूर्ण स्त्री वर्गासाठी पोषक वातावरण निर्माण करेल.

​मी प्रत्येक स्त्रीला आवाहन करते की, आपापसातील मतभेद विसरून एकमेकींतील चांगल्या गुणांचे अवलोकन करा. स्पर्धा करण्याऐवजी पोषक नाते निर्माण करा. एकमेकींना खाली खेचण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा मनाचा मोठेपणा दर्शवा. या क्षणभंगुर जीवनाच्या वाटेवर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची खरी पाठराखीण होऊ शकते, हेच आपल्याला जगाला पटवून द्यायचे आहे.

​या महिला दिनी नवा संकल्प करूया. स्वतःच्या पायावर स्वतंत्र उभी असणारी स्त्री शक्ती जेव्हा एकवटेल, तेव्हा अशक्यही शक्य करता येईल. कोणाच्या दबावाखाली चिरडून न जाता आपली ओळख निर्माण करूया. जो आदर सन्मान दरवर्षी केवळ ८ मार्चलाच मिळतो, तोच सन्मान जर महिलांना संपूर्ण आयुष्यभर मिळाला, तर ही धरा एक सुंदर स्वप्ननगरी बनून जाईल यात दुमत नाही.

​सर्व जगतजननींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

​तुच प्रेरणा.. तुच साधना

तुच करी विश्वाची रचना

तुझ्या चरणी जग नतमस्तक

स्त्रीविना नसे अर्थ जीवना


- ​सौ. राधा (प्रिया) गाड