आपण खरंच आपल्या पूर्वजांसारखं खायला हवं का?

अन्न आणि जीवनशैलीचा परस्पर संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ पूर्वजांचे अनुकरण न करता, स्वतःच्या दैनंदिन शारीरिक गरजेनुसार आणि ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार अन्नाचे प्रमाण व स्वरूप ठरवणे हाच खरा आरोग्याचा मंत्र आहे.

Story: सांगत्ये ऐका |
13th March, 10:53 pm
आपण खरंच आपल्या पूर्वजांसारखं खायला हवं का?

अा​पण अनेकदा ऐकतो की आपल्या पूर्वजांचा आहार आपल्यापेक्षा खूप चांगला होता. त्यांचे अन्न स्वच्छ, नैसर्गिक, रसायनमुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाने बदललेले नव्हते असे सांगितले जाते. त्यामुळे असे वाटते की चांगल्या आरोग्याचे रहस्य कदाचित त्यांच्या आहाराकडे परत जाण्यात असेल.

आजच्या काळात प्रक्रिया केलेले अन्न, कीटकनाशके आणि कृत्रिम घटक याबद्दल लोकांमध्ये चिंता वाढत आहे. त्यामुळे “पूर्वजांसारखा आहार” हा विचार अनेकांना आकर्षक वाटतो. अनेकांना असे वाटते की आपण जर आपल्या आजी-आजोबा किंवा पूर्वजांसारखे खायला लागलो, तर आपण आपोआप अधिक निरोगी होऊ.

पण प्रश्न असा आहे, हे खरोखर इतके सोपे आहे का?

खरं तर, आपल्या रोजच्या जेवणाकडे पाहिले तर आपल्यापैकी अनेकजण आजही जवळजवळ तेच खातो जे आपल्या पूर्वजांनी खाल्ले. भात, चपाती, भाजी, मासे, डाळ आणि घरचे बनवलेले अन्न हे अजूनही आपल्या रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे.

मात्र गेल्या पन्नास-साठ वर्षांत एक मोठा आणि कायमस्वरूपी बदल झाला आहे तो फक्त अन्नात नाही, तर आपल्या जगण्याच्या पद्धतीत झाला आहे.

सर्वात मोठा बदल आपल्या जीवनशैलीत झाला आहे. पूर्वी लोक जास्त हालचाल करायचे, शारीरिक श्रम करायचे, कमी वेळ बसून राहायचे आणि प्रक्रिया केलेले अन्न खूपच कमी खायचे.

खरं तर असेही म्हणता येईल की आपण आपल्या पूर्वजांसारखेच खाऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या सारखेच जगावे लागेल. म्हणजे शेतात काम करणे, पाणी वाहून आणणे, घर बांधणे, लांब अंतर चालणे आणि रोजची अनेक कामे यंत्र किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय करणे.

परंतु आजच्या जीवनात हे वास्तव नाही. आज आपल्या आयुष्यात शारीरिक हालचाल कमी झाली आहे आणि सोयी-सुविधा खूप वाढल्या आहेत. त्यामुळे फक्त आपल्या पूर्वजांसारखे खाणे पुरेसे ठरणार नाही, कारण त्यांच्या आहारामागे वेगळी जीवनशैली होती.

त्याच वेळी आधुनिक डाएट संस्कृतीही अनेक टोकाच्या कल्पना पुढे आणते. काहींना वाटते की भात सोडून चपाती खाल्ल्याने आहार लगेचच आरोग्यदायी होतो. काहींना वाटते की फक्त सॅलड किंवा भाज्या खाल्ल्या, किंवा खूप कमी खाल्ले, तर आरोग्य सुधारेल. पण पोषणशास्त्र इतके सोपे नाही.

म्हणून खरा मुद्दा हा नाही की आपण आपल्या पूर्वजांसारखेच खावे. खरा मुद्दा म्हणजे अन्न आणि जीवनशैली यांचा परस्पर संबंध समजून घेणे. अन्न हे शरीरासाठी उर्जेचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे आपण किती आणि कसे अन्न खातो हे आपल्या दैनंदिन जीवनशैलीनुसार असायला हवे.

पूर्वीच्या पिढ्या शारीरिक श्रम करत असल्यामुळे त्यांना त्या प्रमाणात उर्जा लागायची आणि त्यांनी खाल्लेले अन्न त्या श्रमांमध्ये वापरले जायचे. पण आज अनेकांचे जीवन जास्त बसून काम करणारे झाले आहे.

म्हणून खरी गरज ही पूर्वजांचा आहार तसाच कॉपी करण्याची नाही, तर आपल्या आजच्या जीवनशैलीनुसार योग्य प्रमाणात आणि संतुलित अन्न घेण्याची आहे.


- डॉ. स्नेहल नाईक, म्हार्दोळ