वेळेचा पुरेपूर सदुपयोग करून घ्यायचा असेल तर गरमागरम चहा आणि छानसे पुस्तक, शक्यतो विनोदी... हे कॉम्बिनेशन अनुभवून पहा. आयुष्य किती सुंदर वाटते ते!

मस्त जंगलाचा फील येईल असे वातावरण, रहदारीपासून, गोंगाटापासून दूर, सकाळची वेळ, जरासा थंडावा, थोडेसे कोवळे हवेहवेसे वाटणारे ऊन, समोर मस्त सूर्योदय, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आपण शांत बसलोय आरामखुर्ची टाकून. पूर्ण झोप झालीय आपली रात्रभर, आणि मला सांगा अशा वेळी काय पाहिजे असते आपल्याला?
बरं ते सोडा, अगदी उलट जाऊयात. प्रचंड पाऊस, रस्ते तुडुंब भरलेले, गाड्या लेट, कसेतरी तुम्ही घरी पोहोचता भिजलेले, कुडकुडलेले, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होता आणि केस पुसत बाहेर आल्यावर सांगा बरं कसली आठवण होते? हाsss बास! अहो बरोबर उत्तर... चहाsss!
सांगायचे काय तर वर लिहिलेले दोन्ही सीन टोटली परस्पर विरुद्ध, पण एक गोष्ट त्यात समान ती म्हणजे 'चहा'. आता हा काय प्रकार आहे समजतच नाही हो. भिकाऱ्यापासून राजापर्यंत, शिपायापासून बॉसपर्यंत सकाळी उठल्यावर, काम संपल्यावर, काम वाढले म्हणून, खुशी म्हणून, संताप म्हणून, पहिला आठवतो तो चहा. मग तो घरचा असो वा टपरीवरचा. अहो टेन्शन आले म्हणून पण चहा, आणि टेन्शन गेले म्हणून पण सेलिब्रेशन चहानेच.
मानवी आयुष्याचा एक भाग बनलाय पहा चहा. मग कोणी त्याला उत्तेजक म्हणो किंवा उत्साहवर्धक, कोणी त्याला विष म्हणो किंवा अमृत, पण या चहाने आपले अर्धे जीवन व्यापले आहे हे नक्की.
आमच्या लहानपणी गावी सकाळी सर्व भावंडे रांगेत बसत, मग आई सर्वांना स्टीलच्या पेल्यातून भरून चहा आणि टोस्ट किंवा खारी देई. माझी चहाची पहिली ओळख ती ही. अर्थात तो भरपूर दूध घातलेला आणि ते सुद्धा घरचे, असा चहा. पण हवाहवासा वाटायचा खरे. पण आणखी मागितला तर आई ओरडे, "चा चड पिवप ना, हा पोटान चावता." अरे घोटभर चहा जास्त घेतला तर काय होणार? हा मला पडलेला कायम प्रश्न, असो! आमची आजी कोरा चहा पीत असे, तो सुद्धा गुळाचा. आपला गुपचूप वाटा असायचाच त्यात, पण काय सुंदर लागायचा हो तो चहा! अजून ती चव जिभेवर रेंगाळतेय. गावात दुकानात चहाची बुक्की मिळायची. एक मोठा लाकडी खोका आणि दोन रुपये, पाच रुपयांच्या पुड्या. आमची आत्या मुंबईहून येताना आठवणीने 'रेड लेबल' चहा आणत असे. लाल चौकोनी खोका असायचा. ब्रँडेड चहाची माझी पहिली ओळख.
आजोळी आमच्या आजोबांचे हॉटेल होते, पण त्याकाळी हॉटेलात चहा पिणे निषिद्ध. मग स्वतःचे हॉटेल असले म्हणून काय झाले, "भजी खा, भक्कम पेढे खा, पूण चा पिवप ना हा हॉटेलातलो," असे खुद्द आजोबा सांगत. पहिला बाहेरचा चहा प्यायले मी, तो अकरावीला कॉलेजचे अॅडमिशन घ्यायला फोंड्याला गेले तेव्हा 'पब्लिक कॅफे'त. मग सन्मान, मग आणखी खूपकडे. मला या बाहेरच्या चहाचे एक लॉजिक कळत नाही, कधीही प्या तो सारखाच चवीचा लागतो, नाहीतर आमचा घरचा चहा म्हणजे आज साखरच कमी तर उद्या दूधच कमी, असो!
चहाची खरी चव कळली ना मला ती लग्नानंतर मुंबईला गेल्यावर. आठच दिवस झाले होते लग्नाला. एक दिवस मिस्टरांनी दूध आणायला म्हणून आरेच्या स्टॉलवर नेले आणि चक्क आम्ही गेलो एका चहाच्या टपरीवर. मला हा प्रकार नवीनच, मुळात उभे राहून काचेच्या ग्लासात चहा पिणे मला माहीतच नव्हते. एक फेटा किंवा पगडी बांधलेला राजस्थानी चहा बनवत होता. त्याला 'भट' म्हणायचे हे यांनी मला सांगितले का ते मला माहिती नाही, फक्त चहाचे दुकान आणि तो सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असतो हे मला तेव्हा कळले. उकाळा, गुलाबी, मारामारी काय पण नावे, पण भारी टेस्ट, सुंदर...
आमच्या शाळेत म्हणजे जिथे मी शिकवायचे, तिथे 'शिवा' म्हणून शिपाई होता. अतिशय उर्मट पण चहा फार सुंदर करीत असे. त्या चहामुळेच टिकला होता तो शाळेत. इराण्याचा चहा हा आणखीन एक स्पेशल प्रकार. ब्रन-मस्का आणि चहा म्हणजे मस्त स्वर्गसुख हो. माझ्या नशिबाने चहाची अनेक रूपे अनुभवायला मिळाली. आधी गुळाचा चहा पिणारी मी, मुंबईत नोकरीला लागले, स्टेटस वाढले मग ग्रीन टी काय, कावा काय, भरपूर चहा प्यायले; पण अजूनही गोव्याला गेले की मला लागतो तो कोरा गुळाचा चहाच. तो सुद्धा स्टीलच्या पेल्यात. अगदी कप-बशीत स्टँडर्ड चहा पिणाऱ्यांना मी चहाप्रेमी मानतच नाही. अस्सल चहाची चव ही स्टीलच्या पेल्यातच लागते. मग सोबत कोणी असो नसो. चहाच्या पेल्यात अनेक वाद, भांडणे मिटतात, नवीन संबंध जुळतात, अनेक काही. पण मी चहा पिते तो फक्त माझ्या आनंदाकरिता. वेळेचा पुरेपूर सदुपयोग करून घ्यायचा असेल तर गरमागरम चहा आणि छानसे पुस्तक, शक्यतो विनोदी... हे कॉम्बिनेशन अनुभवून पहा. आयुष्य किती सुंदर वाटते ते! अहो जीवनाचे सार की काय म्हणतात ना ते हेच आहे हो, बाकी सर्व मिथ्या...

सौ. रेशम जयंत झारापकर, मडगाव, गोवा.