पहिलं पाऊल

​शाळा सुटायची वेळ झाली आणि ती वेळेआधीच गेटवर हजर झाली. गेट उघडलं आणि मुलांचा छोटासा लोंढा बाहेर आला. तिचे डोळे फक्त छकुलीला शोधत होते. आणि ती दिसली! तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं.

Story: सौ. मंजिरी वाटवे |
13th March, 11:18 pm
पहिलं पाऊल

अाजची सकाळ काही वेगळीच उगवली होती. खरं तर रोजच्यासारखाच दिवस जसा काल होता, परवा होता, तसाच आजही. पण तिच्यासाठी मात्र आजची सकाळ धडधड वाढवणारी होती. काहीतरी स्वतःपासून दूर जात असल्याची जाणीव करून देणारी. ती दोन तास... पण तिच्या काळजाचा तुकडा जो गर्भात असल्यापासून सतत तिच्यासोबत होता, डोळ्यासमोर असायचा, तो आज दोन तास तिच्यापासून लांब राहणार होता. खिडकीतून येणारा सूर्यकिरणही जणू नव्या प्रवासाची चाहूल देतो आहे, असं तिला वाटलं. घरात सगळं नेहमीसारखं असूनही तिच्या मनात मात्र काहूर माजलं होतं. कारण आज तिच्या छकुलीचा शाळेतला पहिला दिवस होता!

​छकुली अजून गाढ झोपलेली होती. तिचे विखुरलेले केस अलगद बाजूला करताना आईच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला—'ती शाळेत रडेल का? मला सोडून एवढा वेळ ती कधीच राहिलेली नाही, आज दोन तास माझ्याशिवाय कशी राहील? तिला नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील का? शिक्षिका कशा असतील?' अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती तिच्या मनात चालू होती. पण तिने स्वतःला सावरलं. 'आई असणं म्हणजे सततची अशीच घालमेल असते,' याची प्रकर्षाने तिला आज जाणीव झाली.

​"आई, आज शाळा ना?" छकुलीने डोळे चोळत विचारलं. तिच्या आवाजात भीतीऐवजी उत्सुकता आणि आनंद होता. आईने शाळेबद्दल जे रंगवून सांगितलं होतं, त्यावरून तिच्या बालमनाने शाळेचं एक छान चित्र तयार केलं होतं.

"हो गं छकुली, आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस!" आई हसत म्हणाली.

​शाळेचा नवीन निळा-पांढरा युनिफॉर्म घालून छकुली एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. तिचे बॉबकट केलेले केस विंचरताना आईचा हात थोडा थरथरला. डब्यात तिची आवडती पोळी-साखर आणि सफरचंद दिलं. पाण्याची बाटली, रुमाल, छोटा टॉवेल... प्रत्येक गोष्ट आईने दोन-दोनदा तपासून पाहिली. कालपर्यंत कुशीत खेळणारी तिची लाडकी आज खरोखर शाळेत पहिलं पाऊल टाकणार होती.

​शाळेच्या गेटपाशी पोहोचल्यावर आईचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिथे पालकांची गर्दी होती. काही मुलं हसत आत जात होती, तर काही रडत आईला बिलगली होती. छकुलीने आईचा हात घट्ट धरला होता. तिच्या चिमुकल्या तळहाताची ओल आईला जाणवत होती.

"आई, तू मला सोडून घरी जाणार ना?" छकुलीने निरागसपणे विचारलं.

"मी इथेच आहे बाळा, शाळा सुटली की तुला लगेच घ्यायला येईन," आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत धीर दिला.

​शिक्षिकांनी हसतमुखाने छकुलीला आत नेलं. दोन पावलं पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिलं आणि हसत हसत 'टाटा' केला.

​घरी परतल्यावर घर अगदी रिकामं वाटू लागलं. खेळण्यांचा पसारा तसाच होता—भातुकलीची भांडी, अर्धवट रंगवलेलं पुस्तक... प्रत्येक वस्तू छकुलीची आठवण करून देत होती. आई स्वयंपाकघरात चहा करायला गेली, पण तिचं लक्ष घड्याळाकडेच होतं. 'अजून दोन तास बाकी आहेत... छकुली काय करत असेल? रडत तर नसेल ना? तिने डबा खाल्ला असेल का?' आईपण म्हणजे मूल डोळ्यासमोर नसतानाही त्याच्याच विचारांत गुंतून राहणं, हे तिला आज उमजलं होतं.

​अस्वस्थता कमी होत नव्हती, म्हणून तिने मैत्रिणीला फोन केला, पण तिथेही तिचं मन रमेना. नवरोजी शांतपणे पेपर वाचत बसले होते. तिने विचारलं, "काय करत असेल हो आपली छकुली?"

त्यावर ते शांतपणे म्हणाले, "अगं, सोडून आलीस ना शाळेत? ती करेल तिचं ती. तू कशाला उगाच त्रास करून घेतेस?"

त्यांच्या या व्यावहारिक उत्तराने तिला थोडा रागच आला. 'माझ्या भावना कोणालाच समजत नाहीत,' असं पुटपुटत तिने झाडांना पाणी घालण्यात स्वतःला गुंतवून घेतलं.

​शाळा सुटायची वेळ झाली आणि ती वेळेआधीच गेटवर हजर झाली. गेट उघडलं आणि मुलांचा छोटासा लोंढा बाहेर आला. तिचे डोळे फक्त छकुलीला शोधत होते. आणि ती दिसली! तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं. आईला पाहताच ती धावत आली आणि म्हणाली, "आईऽऽ!" तिने आईला घट्ट मिठी मारली.

​"कसं वाटलं शाळेत?" आईने विचारलं.

घरी येईपर्यंत छकुलीची बडबड अखंड चालू होती. वर्गात काय झालं, नवीन मैत्रिणी कोण मिळाल्या... ती सांगत होती आणि आई तृप्त होऊन ऐकत होती. घरात पुन्हा तोच किलबिलाट सुरू झाला आणि आई निर्धास्त होऊन छकुलीच्या गप्पांमध्ये हरवून गेली.


सौ. मंजिरी वाटवे