विघ्नहर्त्याच्या आगमनाने खुलली आनंदाची द्वारे…

गणरायाचे आगमन जितके मंगलमय असते, तितकेच त्याचे विसर्जन डोळ्यांत पाणी आणणारे असते. दहा-पंधरा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि जल्लोषात गेलेले असतात. पण विसर्जनाच्या वेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' हा नाद करत भक्त बाप्पाला निरोप देतात.

Story: ललित |
3 hours ago
विघ्नहर्त्याच्या आगमनाने खुलली आनंदाची द्वारे…

श्रावण मास संपून भाद्रपदाची चाहूल लागते,

लाडक्या बाप्पाच्या आगमनाने‌ अवघी भूमी आनंदमय होते..

'चतुर्थी' अर्थात हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण होय. असा सण ज्या सणामुळे सर्वांची घरेदारे आनंदाने खुलतात. सगळ्यांची मने श्रद्धेने फुलून जातात. चतुर्थी म्हटली की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर भक्ती, उत्साह, जल्लोष यांचा संगम उभा राहतो.   बाप्पाच्या आगमनापूर्वी प्रत्येक घरात अगदी जल्लोषाने तयारी केली जाते, सर्वजण अगदी थाटामाटात गणरायाचे स्वागत करतात. प्रत्येक घरात 'गणपती बाप्पा मोरया' असा नाद ऐकू येत असतो आणि आरत्यांनी व मोदकांच्या सुवासाने अवघी भूमी सजून जाते.

अर्थातच, गणेशोत्सव म्हणजे अवघ्या जगाला दुःखातून आनंदाकडे नेणारा एक महत्त्वाचा सण होय. मंगलमूर्तीचे आगमन होताच प्रत्येक घरातील माणूस आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे विसरून बाप्पाच्या चरणांशी लीन होतो. गणरायाला आपण आराध्य दैवत मानतो, जो आनंदाचा व सकारात्मकतेचा अधिष्ठाता आहे आणि म्हणूनच गणरायाचे पाय घरात पडताच सगळी विघ्ने दूर होतात. प्रत्येक घरात समाधान लाभते, आणि बाप्पाच्या श्रद्धेत, भक्तीत रमत जाता - जाता संपूर्ण भूमी मंगलमय होते.

गजाननाच्या आगमनाने सर्वत्र आनंद होतो. गणपती अर्थातच समाधान, सुख व मांगल्य यांचे प्रतीक आहे आणि म्हणूनच चतुर्थीला दूर गावी, परदेशात राहणारी माणसे आपल्या गावी चतुर्थी साजरी करायला येतात. अर्थातच, गणेशाच्या आशीर्वादाने नातीगोती टिकून राहतात. प्रत्येक कुटुंब चतुर्थीच्या दिवसांमध्ये आनंदात असते. जरी नात्यांमध्ये दुरावा असला तरीही गजाननाच्या कृपेने सगळी नाती एकत्र येऊन चतुर्थी साजरी करतात आणि हेच चतुर्थी या सणाचे एक मुख्य उद्दिष्ट आहे. 

चतुर्थी हा सण मोठ्यांबरोबर लहान मुलांना देखील खूप जवळचा असतो. बाप्पाचे आवडते खाद्य म्हणजे 'मोदक' आणि चतुर्थीला प्रत्येक घरात बाप्पाला मोदकांचा प्रसाद चढविला जातो. यात खरोखर मज्जा होते ती म्हणजे लहान मुलांची. जी मुले स्वतः मोदक खाऊन आनंद घेतात तसेच फटाके, नारंगी असे सगळे खरेदी करून चतुर्थी अगदी थाटात साजरी करतात. गणराया प्रत्येकाच्या सुखासाठी आशीर्वाद देत असतो आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती बिनधास्तपणे अगदी जल्लोषाने चतुर्थी साजरी करतो. 

आज प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. मग तो घरामध्ये असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असो. दोन्ही ठिकाणी भक्तगण भक्तिभावाने गणरायाच्या चरणाशी लीन होतात. सांस्कृतिक कार्यक्रम, भजने, कीर्तने यामुळे आज गणेशोत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा सण बनलेला आहे. जितक्या आनंदाने बाप्पा आपल्याला आगमनाने प्रत्येक घरात सुख समाधान मिसळतात, तितक्याच जल्लोषाने समाजातील लोकांमधील बांधिलकी टिकवून ठेवतात आणि म्हणूनच आज गणेश चतुर्थीचा सण सर्वांसाठी मोठा ठरतो. 

पाच, सात, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवस बाप्पा घराघरात विराजमान राहतात आणि त्या दिवसांमध्ये अवघे घर आनंदमय होते. चतुर्थीला सर्वांच्या घराची दारे खरोखर आनंदाने फुलतात, नातीगोती टिकतात, सर्व विघ्ने दूर होतात आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी लोक बाप्पाच्या आगमनाची आतूरतेने वाट पाहतात. 

गणरायाचे आगमन जितके मंगलमय असते, तितकेच त्याचे विसर्जन डोळ्यांत पाणी आणणारे असते. दहा-पंधरा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि जल्लोषात गेलेले असतात. पण विसर्जनाच्या वेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' हा नाद करत भक्त बाप्पाला निरोप देतात. हा निरोप म्हणजे केवळ एक विभक्ती नसून पुन्हा भेटीचे आश्वासन असते. बाप्पा जाताना प्रत्येकाच्या मनात श्रद्धा, आशा आणि एकोप्याची बीजे पेरून जातात.

अर्थातच, विसर्जनानंतरही गणरायाची कृपा घराघरात राहते आणि म्हणूनच लोक पुढच्या वर्षीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात.

म्हणूनच, अवघ्या जगाला ताराणाऱ्या, सर्वांचे रक्षण करणाऱ्या आपल्या गणरायाला एकच मागणे, हे गणराया, 'सर्वांना सुखात ठेव. आणि तुझ्या कृपेने सर्वांचे जीवन मंगलमय कर'.


पूजा भिवा परब

पालये-पेडणे