लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मायेचा आधार बनलेल्या प्रा. सौ. पौर्णिमा केरकर यांचा प्रवास. गोमंतकीय संस्कृती आणि पर्यावरणाच्या जतनासाठी झटणाऱ्या एका सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा शब्दवेध.

त्यांच्याविषयी खूप काही ऐकले होते. जेव्हा जेव्हा त्या एखाद्या साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला भेटायच्या, तेव्हा मी त्यांच्याकडे अगदी कुतूहलाने पाहायचे. एके दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा योग आला.
ताई अध्ययनासाठी महाविद्यालयात गेल्या होत्या. सकाळची वेळ होती. घरात चार पाच मुलांचा वावर होता. मी काळा चहा घेते म्हटल्यावर मला त्यांनी अगदी आले, गवती चहा घातलेला सुगंधित असा चहा आणि नाश्ता अगदी अगत्याने खाऊ घातला. राजेंद्र केरकर सरांच्या बोलण्यावरून ती मुले विद्यार्थी आहेत असे समजले. मी रिवण गावची म्हटल्यावर त्यांनी माझ्याशी तिथला हिरव्यागार निसर्ग, वनश्री, लोकसंस्कृती यांच्यावर बोलायला सुरुवात केली. मी आजवर जे काही ऐकले होते ते सत्य असल्याचे माझ्या मनाने नकळत खूणगाठ बांधली. ते निवासस्थान होते प्रा. सौ. पौर्णिमा राजेंद्र केरकर ताईंचे. जणू हास्याचे आणि समाधानाचे आनंदवनच! आणि विद्येचे माहेरघर म्हटले तर वावगे ठरणार नाही.
लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक प्रा. सौ. पौर्णिमा राजेंद्र केरकर. गोव्याच्या मातीत रुजलेली, निसर्गसंपन्न गोव्याच्या मातीत लहानाची मोठी झालेली आणि गोमंतकीय लोकसंस्कृती, लोकसाहित्य, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, लोकधर्म अशा विषयांवर सातत्याने तन्मयतेने लेखन करणाऱ्या प्राध्यापिका म्हणजेच पौर्णिमाताई. आजही त्यांच्याकडे गरजू विद्यार्थी येतात, आपुलकीने राहतात व शिक्षण घेऊन ताठ मानेने स्वावलंबी जीवन जगायला शिकतात. शांत, संयमी, स्मितहास्य लाभलेली, सालस आणि सर्वांशी मायेने मिळून मिसळून वागणाऱ्या प्रा. सौ. पौर्णिमा ताई म्हणजे एक अजब रसायन.
पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नेहमीच कार्यरत असलेल्या श्री. राजेंद्र केरकर सरांच्या त्या धर्मपत्नी व त्यांच्या खांद्याला खांदा लावून पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या पौर्णिमा ताईंचा जन्म पेडणे तालुक्यातील निसर्गरम्य 'पालये' गावी एका सुसंस्कृत घराण्यात झाला. त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते. बालपणी धालो मांडावर धालो, फुगडी खेळायला त्यांना खूप आवडायचे. लोककलेचा आणि लोकसंस्कृतीचा संपन्न वारसा त्यांना या गोमंतभूमीच्या पवित्र लाल मातीतूनच जन्मतः प्राप्त झालेला आहे. गोवा विद्यापीठातून त्यांनी मराठी व कोकणी दोन्ही भाषांतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. पूर्वश्रमीची परब घराण्यातील ही सुकन्या लग्नानंतर सौ. पौर्णिमा राजेंद्र केरकर झाल्या व केरी गावात गरजू विद्यार्थ्यांसाठी मायेचा कणखर आधार बनल्या. त्याच दरम्यान डिचोली तालुक्यातील मुळगाव येथील ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून विद्यादानाच्या कार्याला त्यांनी सुरुवात केली होतीच. कॉलेज शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांत दडलेल्या सुप्त गुणांना शोधून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्याला त्यांनी स्वतःला झोकून दिले.
आजवर अनेक विद्यार्थ्यांच्या त्या मार्गदर्शक ठरलेल्या आहेत. आपले पती श्री. राजेंद्र केरकर यांच्या सहकाऱ्याने बारावीनंतर शिक्षण थांबवणाऱ्या खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. गोव्याची लोकसंस्कृती, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांशी सतत निगडित राहून गोव्याच्या लोकसंस्कृतीचा वेध अगदी अथकपणे त्या घेत आहेत. त्याच अनुषंगाने गोमंतकाच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील महिलांना प्रत्यक्ष भेटण्याचा त्यांना योग आलेला आहे. या महिलांना त्यांच्या आहाराविषयी, आरोग्याविषयी जागरूक करण्याचे मौल्यवान कार्य त्यांनी केलेले आहे. लोकसाहित्य, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, लोकधर्म अशा दुर्मिळ विषयांवर त्यांनी आजवर सकस लेखन केलेले आहे. गोव्याच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने संशोधन करण्याचे कार्य मोठ्या आत्मीयतेने पौर्णिमाताई गेल्या दीड-दोन दशकांपासून करीत आहेत.
'विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठानच्या' अध्यक्षा या नात्याने अनेक सामाजिक उपक्रम त्या राबवत आहेत. एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायची असते, या अनुषंगाने त्यांनी आपल्या कन्येलाच म्हणजे कु. समृद्धी राजेंद्र केरकर हिला बिनभिंतीच्या निसर्गाच्या व पर्यावरणाच्या शाळेत शिक्षण दिलेले आहे. निसर्गकन्या समृद्धी आज उत्कृष्ट चित्रकार म्हणून सुपरिचित तर आहेच, शिवाय उत्तम कवयित्री म्हणूनही सुप्रसिद्ध आहे व स्वतःच्या पायावर उभी आहे.
गोव्याचे लोकसाहित्य, लोकसंस्कृतीवर आधारित अनेक दर्जेदार अशा पुस्तकांचे लेखन पौर्णिमा ताईंनी केलेले आहे. 'अनुबंध लोकगंगेचे' तसेच 'गोव्यातील धालोत्सवाचे स्वरूप' या ग्रंथांचे त्यांनी लेखन केलेले आहे. 'विस्मृतीच्या उंबरठ्यावर' याही ग्रंथाचे त्यांनी लेखन केलेले आहे. शिवाय 'स्पंदन' हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे. हल्लीच 'गोमंतकीय लोकसाहित्य दृष्टिक्षेप' या पुस्तकाचे त्यांनी संपादन केलेले आहे. भूतखेतांच्या, देवचारांविषयीच्या कथा त्यांनी 'अथक' या लेखमालेतून मांडलेल्या आहेत. 'लोकसंस्कृतीचे नंदादीप' या लेख मालिकेतून त्यांनी गोमंतकीय प्रकाशात न आलेल्या लोककलाकारांविषयी, कारागिरांविषयीच्या योगदानाबद्दल लिहिलेले आहे.
त्यांना अनेक मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 'दि गोवा हिंदू असोसिएशन'चा बा. भ. बोरकर पुरस्कार, हरित शिक्षण शिक्षक पुरस्कार यांचा या पुरस्कारांत समावेश आहे. गोमंतभूषण असलेल्या या गोमंतकीय सुकन्येवर ज्येष्ठ दिग्गज साहित्यिक माधवीताई देसाई यांनी 'सूर्यफुलांचा प्रदेश' या आपल्या ग्रंथात त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे. साधी राहणी आणि उच्च विचार यांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या त्या आदर्श आहेत. माझ्या 'आठवणींचे गाठोडे' या पुस्तकाला पौर्णिमाताईंनी सुंदर अशी प्रस्तावना देऊन पुस्तकाचा दर्जा वाढविला आहे, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते.

- सौ. शर्मिला प्रभू
मडगाव - गोवा