एका साध्या गृहिणीपासून आदर्श बचत गट प्रमुख बनण्यापर्यंतचा सुमित्राताईंचा प्रवास जिद्दीची साक्ष देतो. स्वतःला सिद्ध करत त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर गावातील अनेक महिलांचे आयुष्य स्वावलंबनाने उजळून टाकले आहे.

आज गावात सकाळपासून वेगळीच लगबग आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर फुलांची आरास, रंगीत पताका आणि मोठे व्यासपीठ उभारलेले आहे. निमित्त आहे महिला दिनाचे. यावर्षीचा आजचा दिवस गावासाठी खास आहे आणि त्याचे कारणही तसेच विशेष आहे.
वालावल गावात अनेक बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकी उत्तम कामगिरी केलेल्या 'सावित्री बचत गटा'च्या प्रमुख सुमित्राताईंचा तालुकास्तरावर सन्मान होणार आहे. त्या कार्यक्रमाची सगळी तयारी करण्यात ग्रामपंचायतीचे कर्मचारी व्यस्त होते. तालुका अधिकारी या कार्यक्रमानंतर गावातील इतर विकासकामांची पाहणी करणार असल्यामुळे त्या त्या वाडीवरच्या ग्रामस्थांची लगबग सुरू होती.
सुमित्राताई सकाळी नेहमीप्रमाणे पाच वाजताच उठली. चुलीवर चहाचे आधण चढवताना तिच्या मनात मात्र वेगळीच धडधड आहे. इतकी वर्षे काम केले, धडपड केली, बचत गटाच्या सदस्यांना सांभाळून घेतले, त्यांच्या अडीअडचणी पदरमोड करून भागवल्या. बचत गटाच्या निधीचा कधीच गैरवापर केला नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन काम केले, म्हणूनच आज गावात इतर चार बचत गट कार्यरत असले तरी माझ्या बचत गटाचे कौतुक होत आहे. सगळ्यांनी सहकार्य केले म्हणून तर बचत गट कौतुकास्पद कामगिरी करत आहे. पण प्रमुख म्हणून आज तिचे नाव सगळ्यांसमोर घेतले जाणार आहे.
आरशात केस विंचरताना ती स्वतःकडे नव्यानेच पाहते. 'मी खरंच इतकी मोठी आहे का?' असा प्रश्न तिच्या मनात येतो.
सुमित्राताईंचे आयुष्य साधे आणि कष्टाचे. नवरा शेतमजूर, दोन मुले शिकतायत. घरखर्च भागवताना कितीदा तिने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. पण पाच वर्षांपूर्वी गावात महिलांचा बचत गट सुरू करण्यासाठी तिने पुढाकार घेतला. सुरुवातीला दहा दहा बायकांना जमवून दोन बचत गट तयार केले. दर महिन्याला शंभर रुपये जमा करायचे असे ठरवले खरं, पण काहींना शंका तर काहींना भीती वाटली. 'आपल्याला हे जमेल का?' असा प्रश्न प्रत्येकीच्या चेहऱ्यावर होता. यावर उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात हुशार आणि धडाडीच्या सुमित्राताईंची निवड केली आणि त्यांना तालुक्याला प्रशिक्षणासाठी पाठवले.
तालुक्याला जाऊन आठ दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आल्यावर सुमित्राताईंनी मग प्रत्येकीच्या मनातील भीती आणि शंका दूर करण्यासाठी प्रयत्न केले आणि उभा राहिला 'सावित्री बचत गट'.
प्रशिक्षणासाठी पहिल्यांदाच ती घरापासून लांब आठ दिवस तालुक्याच्या ठिकाणी राहिली. ते उचललेले पाऊल तिच्या आज होणाऱ्या सन्मानापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रवासाची सुरुवात होती.
सावित्री बचत गटाने हळूहळू पावले टाकली. छोटी कर्जे घेऊन महिलांनी घरात शेळ्या, कोंबड्या इत्यादी व्यवसाय सुरू केले. पापड-लोणची तयार करून विकायला ठेवली. कुणी शिवणकाम शिकली. सुमित्राताई प्रत्येकीच्या घरी जाऊन विचारपूस करायची, बँकेतील व्यवहार समजावून सांगायची. आज सगळ्या जणी आपापल्या परीने शिकल्या आहेत, याचे श्रेय त्या सुमित्राताईंना देतात. दुपारी कार्यक्रम सुरू होतो. व्यासपीठावर सरपंच, पंचायत सदस्य आणि तालुक्याचे अधिकारी बसलेले आहेत. गावातील मुलींचे नृत्य आणि महिलांची लेझीम सुरू आहे. टाळ्यांचा कडकडाट होत आहे.
सूत्रसंचालक सुमित्राताईंचे नाव घेतो आणि त्यांच्या कामाचा आढावा सांगतो. "गावातील 'सावित्री महिला बचत गट' गेल्या तीन वर्षांत आदर्श ठरला आहे..." हे शब्द ऐकताना सुमित्राताईंच्या डोळ्यांत पाणी येते.
तिचे नाव पुकारले जाते. ती सावकाश पायऱ्या चढते. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने व्यासपीठावरून फक्त इतरांना बोलताना पाहिलेले, आज ती स्वतः तिथे उभी आहे. तिच्या हातात शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह दिले जाते. टाळ्यांचा आवाज कानात घुमतो. तिच्या मुलांचा अभिमानाने उजळलेला चेहरा तिला दिसतो. नवरा मागच्या रांगेत उभा राहून टाळ्या वाजवत आहे.
माईकसमोर उभी राहिल्यावर तिला थरथरायला होते, पण ती बोलायला लागते. "हा सन्मान फक्त माझा नाही, आपल्या सगळ्या बहिणींचा आहे. सुरुवातीला आम्हाला खूप बोलणी खावी लागली. 'बायकांनी काय व्यवसाय करायचा?' असे लोक म्हणत होते. पण आज महिलांच्या घरी उत्पन्न वाढत आहे. मुले चांगल्या शाळेत जात आहेत. घरातला आत्मविश्वास वाढला आहे."
कार्यक्रमानंतर गावातल्या बायका तिच्याकडे जाऊन म्हणतात, 'ताई, तुमच्यामुळे आम्हाला व आपल्या बचत गटालाही ओळख मिळाली.'
संध्याकाळी घरी परतल्यावर ती सन्मानचिन्ह देव्हाऱ्याजवळ ठेवते. दिवा लावताना तिच्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून येते.
महिला दिनाच्या या विशेष क्षणी गावातील सर्वांना जाणवते की, सुमित्राताईंसारखी एक साधी स्त्री पुढे येते आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य मार्गी लावते. अल्पशा मदतीने महिलांना स्वावलंबी बनवते.
आज तिच्या हातात सन्मानचिन्ह आहे, पण त्यापेक्षा जास्त तेज तिच्या चेहऱ्यावर आहे. आत्मविश्वासाचे, कष्टाचे आणि स्वतःला सिद्ध केल्याचे समाधान तिच्या मनात आहे. गावातील सर्वांना या गोष्टीचे विशेष कौतुक वाटत आहे.

- सौ. मंजिरी वाटवे