गोष्ट एका स्त्रीची..

​आई, पत्नी वा मुलगी... स्त्रीची ओळख नेहमी नात्यांच्या विस्ताररेषेतच का अडकते? स्वतःला हरवून नाती जपणाऱ्या स्त्रियांच्या अंतर्मनाचा आणि त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा वेध घेणारा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेला एक चिंतनशील प्रवास.

Story: मनी मानसी |
06th March, 10:00 pm
गोष्ट एका स्त्रीची..

ही अमुकची आई... 

तमुकची बायको...

फलाण्याची मुलगी... 

आपल्या समाजात एका स्त्रीची ओळख करून देताना ही वाक्ये इतकी सहजपणे वापरली जातात की त्यात काहीच विसंगत वाटत नाही. जणू तिचं स्वतंत्र अस्तित्व नसून ती एखाद्या नात्याचीच विस्ताररेषा आहे.

बघा ना, बालपणापासूनच तिची ओळख कुणाच्या तरी संदर्भानेच सांगितली जाते. आधी “अमुकची मुलगी”, नंतर “अमुकची बायको”, पुढे “अमुकची आई”. या प्रवासात तिचं स्वतःचं नाव असतं, पण तिची ओळख मात्र इतरांच्या नावाभोवती फिरत राहते.

मला समुपदेशनानिमित्त अनेक स्त्रिया भेटतात. त्या जबाबदार असतात, संवेदनशील असतात, नाती जपण्यात कुशल असतात. पण एखाद्या क्षणी त्या सहज म्हणतात, 

“मला कधी कधी वाटतं... मी नेमकी कोण आहे गं?”

आता हा प्रश्न वरकरणी अत्यंत साधा वाटतो, पण मानसशास्त्रीय दृष्टीने तो खूप सखोल आहे.

खरंतर, एक स्त्री अनेक भूमिका निभावते. मुलगी, बहीण, पत्नी, आई, सून, मैत्रीण... प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला इतक्या प्रामाणिकपणे झोकून देते की कधी कधी तिच्या स्वतःच्या इच्छा, स्वप्नं आणि आवडी हळूहळू मागे पडतात. हे नेहमीच कुणी जबरदस्तीने करत नाही.. अनेकदा ती ते स्वतःहून देखील करत असते. कारण तिच्या मनात “नातं टिकवणं” ही भावना खूप मजबूत असते.

परंतू ह्या सगळ्यात प्रश्न असा आहे की, नात्यांमध्ये जगताना खरंच स्त्रीने स्वतःला हरवणं आवश्यक आहे का?

मला विचाराल तर नाही. कारण, एखादी स्त्री आई असू शकते आणि तरीही ती स्वतःची स्वप्नं पाहू शकते. ती पत्नी असू शकते आणि तरीही तिची वैयक्तिक ओळख असू शकते. 

Psychoanalysis च्या दृष्टीने पाहिलं तर माणसाची ओळख ही केवळ बाह्य भूमिकांमधून तयार होत नाही तर ती त्याच्या अंतर्मनातील अनुभव, इच्छा आणि स्वतःबद्दलच्या जाणिवांमधून घडत असते. बालपणापासून आपण ज्या नात्यांमध्ये वाढतो, ज्या अपेक्षा ऐकतो, ज्या भूमिका निभावतो त्या सगळ्या आपल्या self-concept ला आकार देतात.

स्त्रियांच्या बाबतीत मात्र एक वेगळी प्रक्रिया दिसते. त्यांची ओळख अनेकदा “relational identity” बनते म्हणजे स्वतःला समजून घेण्याचा आधार नात्यांमध्ये शोधला जातो. “मी आई आहे”, “मी पत्नी आहे”, “मी मुलगी आहे” या भूमिका इतक्या महत्त्वाच्या होतात की कधी कधी त्या भूमिकांपलीकडची “मी” मागे पडते.

याविषयी अधिक खोलात अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, फ्रॉईडच्या मनोविश्लेषणात “अंतर्मनातील इच्छा” आणि “समाजाच्या अपेक्षा” यांच्यातला मानवी संघर्ष सांगितला आहे आणि स्त्रियांच्या आयुष्यात हा संघर्ष अनेकदा सूक्ष्म स्वरूपात दिसतो. कसा? 

एकीकडे तिच्या मनात स्वतःची स्वप्नं, आवडी, आकांक्षा असतात तर दुसरीकडे समाजाने दिलेली भूमिका असते.. समजूतदार, त्यागी, सगळ्यांना सांभाळणारी.

आणि मग ती नकळत स्वतःला थोडं थोडं बाजूला ठेवायला शिकते.

पण मनाच्या पृष्ठभागाखाली एक प्रश्न मात्र कायम जिवंत 

असतो, मी कोण आहे, या सगळ्या नात्यांपलीकडे?

म्हणूनच, मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी “identity” हा व्यक्तिमत्त्व विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला आहे. एखाद्या व्यक्तीला स्वतःची स्पष्ट ओळख जाणवली, तर त्याच्या आयुष्यात स्थैर्य आणि समाधान वाढतं. पण जर ओळख सतत बाह्य भूमिकांवर अवलंबून राहिली, तर मनात कधी कधी अस्पष्ट अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

त्यामुळे अनेक स्त्रिया जेव्हा त्यांच्या आयुष्याचा बराचसा भाग इतरांसाठी जगतात, तेव्हा एक टप्पा असा ही येतो, जेव्हा त्या स्वतःकडे परत वळून पाहू लागतात. कधी एखादं जुनं छंद पुन्हा हातात घेतात, कधी शिक्षण पुढे चालू करतात, कधी स्वतःच्या आवडीसाठी वेळ काढायला शिकतात. हा प्रवास बाहेरून छोटा दिसतो, पण आतून तो खूप मोठा असतो कारण तो स्वतःकडे परत येण्याचा प्रवास असतो.

ह्यावरून हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आपल्या समाजात जरी एका स्त्रीची ओळख नात्यांमधून तयार होत असली तरी देखील असते ती फक्त त्या नात्यांपुरतीच मर्यादित नसते. तिच्या अनुभवांचा, स्वप्नांचा, विचारांचा आणि संवेदनांचा एक स्वतंत्र पट असतो कारण नाती आणि स्वतःची ओळख या दोन गोष्टी परस्परविरोधी नाहीत.. उलट त्या एकमेकींना समृद्ध करतात.

माझ्या प्रिय वाचक मंडळींनो, उद्याच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यातील स्त्रियांना शुभेच्छा देवू, कदाचित फुलांचा गुच्छ देखील देवू. पण कदाचित त्याहून महत्त्वाची गोष्ट आपण तिला भेट देवू शकतो ते म्हणजे तिला तिच्या स्वतःच्या अस्तित्वाने ओळखणे.

उद्या जर एखाद्या स्त्रीला तुम्ही विचारलं, “तू कोण आहेस?”

आणि तिने उत्तर दिलं, “मी फलाण्याची आई” किंवा “अमुकची बायको” तर यापलीकडे जाऊन, “मी... मी आहे” असं म्हणण्याचा आत्मविश्वास जर आपण तिला देवू शकलो तर तिथेच तिच्या अस्तित्वाचा खरा जन्म होत असतो. आणि कदाचित महिला दिनाच्या आनंदाचा खरा अर्थही तिथेच दडलेला असेल.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४