आईची शिस्त ते साहित्याची रेशमगाठ एक कृतज्ञ प्रवास

उंबऱ्याच्या आतील स्त्रीने जग अनुभवले आणि आजची सक्षम स्त्री घडली. आईच्या शिस्तीपासून ते शिक्षिका आणि लेखिका होण्यापर्यंतचा माझा हा कृतज्ञ प्रवास, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास वाचकांसाठी.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
06th March, 10:16 pm
आईची शिस्त ते साहित्याची रेशमगाठ एक कृतज्ञ प्रवास

८ ​​मार्च, जागतिक महिला दिन. जगन्माता स्त्रीचा सन्मान दिवस. जग बदलू लागले, जुनी श्रद्धा, अंधश्रद्धेची, आचार-विचारांची वल्कले गळून पडली. उंबऱ्याच्या आतील स्त्रीने जग पाहिले, अनुभवले आणि त्यातूनच तयार झाली आजची सक्षम, सुविद्य स्त्री.

​आम्ही चार बहिणी, आई, आजी त्यामुळे घरात तशी स्त्रीसत्ताच म्हणा ना! लहानपणापासूनच आईच्या मुशीत वाढले मी. मोठी मुलगी असल्याने तिचा माझ्यावर जास्त जीव होता. माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक आदर्श स्त्रियांमध्ये आईला प्रथम स्थान देईन मी. नुसते घरात नव्हे तर या जगात चालायला शिकवले तिने मला. कडक शिस्तीची आणि तेवढीच प्रेमळ, सुगरण अशी माझी आई. खूप घाबरट होती हो मी लहानपणी. स्टेजवर उभे राहणे सोडा, अहो शाळेत जायला पण घाबरायचे मी. अक्षरशः जास्वंदीच्या फोकाने मारलंय मला शाळेत जाण्यावरून. पण नंतर तीच पायाला तेल पण लावायची. त्यामुळेच तर मी खूप धीट झाले. त्याच शिस्तीचा मला उपयोग झाला शाळेत, कॉलेजात, गॅदरिंग, स्टेज प्रोग्राम, कविता वाचन आणि बरंच काही.

​तिकडे प्रायमरी होऊन हायस्कूलमध्ये पोहोचले. शाळा खूप लांब होती. चालत जावे लागे. अर्थात अजूनही खेडोपाड्यात तीच परिस्थिती आहे म्हणा, शाळेत जाईपर्यंतच दमायचो आम्ही. शिकायचा मूडच नसायचा, अशा वेळी आमच्या आयुष्यात आल्या विश्रांती टीचर आणि शकुंतला टीचर. काय वर्ग फुलवायच्या की हो त्या! कोमेजलेल्या कळ्यांना कसे तरतरीत करावे हे त्यांच्याकडून शिकावे. विषय कसा सोपा करावा, विद्यार्थ्यांची भीती कशी घालवावी हे मी त्यांच्याकडून शिकले. खरं सांगू, लहानपणीचे स्वप्न होते डॉक्टर बनायचे, पण विश्रांती टीचरकडून प्रेरणा घेऊन मी शिक्षिका झाले. आजही ते ऋण मानते मी. साहित्य आणि शिक्षक पेशा याचा पाया विश्रांती टीचरनी घातला हे खरे.

​शिक्षिका व्हायचे ठरवले खरे, पण पदवी मिळताच शिक्षिकेऐवजी पत्नी झाले मी. शैक्षणिक क्षेत्रात उतरायच्या तयारीत असलेली मी चक्क संसाराच्या महासागरात पडले की हो! पण खरं सांगू, खूप नशीबवान मी. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते म्हणतात, पण माझ्याबाबत नेमके उलटे झाले. सासरचा खूप सपोर्ट मिळाला. चक्क मुंबईत बी.एड.ला प्रवेश घेतला. आमच्या हेड होत्या पालशेतकर मॅडम. मॅडम कमी, मैत्रिणीच म्हणा हवे तर. वयाचे अंतर त्यांनी कधीच येऊ दिले नाही आमच्या नात्यात. माझ्या सासऱ्यांनी माणसे वाचायला शिकवले मला आणि त्यात भर घातली पालशेतकर मॅडमनी.

​साध्या साध्या माणसात सुद्धा काय गुणविशेष दडलेले असतात हो! फक्त योग्य परिस्थिती हवी. अंगभूत गुण जसे माणूस मोठा व्हायला गरजेचे असतात, तशी ते परिस्थितीवरही अवलंबून असतात असे मला वाटते. आज मी जे 'व्यक्ती एके व्यक्ती' हे सदर सुमारे पंचवीस आठवडे चालवले, हे त्याचेच फळ.

​मुंबईत करिअर घडले माझे, पण अचानक यजमानांच्या नोकरीमुळे परत आलो आम्ही गोव्यात. मडगाव येथे राहिलो. काही वर्षे गप्प होते, नोकरी एके नोकरी चालू होती. पण म्हणतात ना, एक खुमखुमी असते, तसे ते झाले. माझी मैत्रीण वर्षा मेंगाणे हिने मला 'अशोक बोरकर काव्य मैफिलीत' नेले आणि बास्स, मला पाहिजे तसा प्लॅटफॉर्म मिळाला. काव्य मैफिलीच्या संस्थापिका कविताताई बोरकर, ज्येष्ठ लेखिका रजनीताई रायकर, किती नावे सांगू! खूप पुढे काढले त्यांनी मला. काव्यवाचन आणि लेखन परत सुरू झाले माझे. याच काव्य मैफिलीत ओळख झाली कविता आमोणकर यांची. मूळच्या कवी आणि पत्रकार असलेल्या त्यांनी मला वर्तमानपत्रात लेख लिहिण्यास उद्युक्त केले. दैवी योजना असावी कदाचित की मी काव्य मैफिलीशी संलग्न झाले. मी लिहिलेले लेख, व्यक्तिचित्रण वर्तमानपत्राच्या पुरवणीत छापून येऊ लागले. वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला मला. अनेक विषय वाचकांनीही सुचवले. सोनचाफा प्रकाशन तर्फे माझा पहिला ललित लेखसंग्रह 'रेशमगाठ' प्रकाशित झाला. त्याला गोवा मराठी अकादमीचा गौरव पुरस्कारही लाभला आहे.

​जीवनात अनेक अनुभव घेतले मी. चांगली, वाईट अनेक माणसे भेटली. थोडी लक्षात राहिली तर थोडी आली तशी गेली. पण जी लक्षात राहिली ना, त्यांना विसरणार नाही मी. कारण तीच तर माझ्या 'व्यक्ती एके व्यक्ती'च्या मुख्य नायक आणि नायिका आहेत हो. आपण जर डोळे आणि मेंदू उघडे ठेवून वावरलो ना, तर याच माणसांपासून खूप काही शिकता येते. विषय असतो छोटासा, पण तो फुलवायचा कसा आणि वाचकांपर्यंत न्यायचा कसा हे आपले काम.

​आज जागतिक महिला दिनी माझे जवळजवळ पंचवीस आठवडे चाललेले 'व्यक्ती एके व्यक्ती' हे सदर समाप्त नाही करीत, पण जरा थांबवते मी. वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला मला, धन्यवाद! आता नवीन काही विषय घेऊन येते, नव्या रूपात...

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!


- सौ. रेशम जयंत झारापकर