नाईट ड्युटी अपरिहार्य असली तरी शरीराच्या जैविक चक्राचा आदर करणे अत्यावश्यक आहे. तिचे संतुलन राखणे म्हणजेच दीर्घकालीन हार्मोनल आणि मानसिक आरोग्य जपणे आहे.

रात्रीचे दोन वाजले होते. हॉस्पिटल वॉर्डच्या कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती. फक्त मॉनिटरचे बीप-बीप आवाज आणि अधूनमधून येणारी पावलांची चाहूल. डॉ. श्रीया सलग तिसऱ्या नाईट ड्युटीवर होती. हातात कॉफीचा मग, डोळ्यांच्या पापण्यांजवळ येऊन थांबलेली झोप आणि मनात पुढच्या केसची तयारी.
सकाळी सातला ड्युटी संपली, पण तिचा दिवस संपला नव्हता. घरी गेल्यावर मुलाला शाळेसाठी तयार करणे, घरातील कामे, इतर आवराआवर...आणि मग दुपारी झोपायचा प्रयत्न. पण खिडकीतून येणारा प्रकाश, घरातील आवाज आणि डोक्यात असलेला तणाव यामुळे झोप काही लागत नव्हती. गेल्या काही महिन्यांत तिची पाळी अनियमित झाली होती. वजन थोडे वाढले होते. चिडचिड, डोकेदुखी आणि थकवा सतत जाणवत होता. “हे सगळं कामामुळेच होतंय,” हे तिला समजले होते. शरीराचे संकेत गंभीर रूप घेण्याआधी आपण यावर काय करू शकतो हा विचार ती करू लागली.
डॉ. श्रीयाची ही कथा केवळ एका डॉक्टरपुरती मर्यादित नाही. आरोग्यसेवा, आयटी, उद्योग, सुरक्षा सेवा अशा अनेक क्षेत्रांत नाईट शिफ्ट करणाऱ्या हजारो महिलांचा हाच संघर्ष आहे. समाजाची चाके रात्रीही फिरती ठेवताना त्यांच्या शरीरातील जैविक घड्याळ मात्र विस्कळीत होत असते. याच संघर्षातून पुढे उलगडतो प्रश्न, नाईट ड्युटीचा महिलांच्या सर्केडियन रिदम आणि हार्मोनल आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? आणि त्यावर उपाय काय?
चला तर मग महिला दिन निमित्ताने आपण आज महिला आरोग्याच्या या विषयावर बोलू..
सर्केडियन रिदम म्हणजे काय?
सर्केडियन रिदम म्हणजे आपल्या शरीराचे २४ तासांचे नैसर्गिक जैविक घड्याळ. हे घड्याळ झोप-जागेपण, भूक, शरीराचे तापमान, हार्मोन्सची निर्मिती यावर नियंत्रण ठेवते. प्रकाश आणि अंधार हे या घड्याळाचे मुख्य नियंत्रक घटक आहेत. रात्री अंधार पडल्यावर शरीरात मेलाटोनिन हे झोपेसाठी आवश्यक हार्मोन तयार होते. सकाळी सूर्यप्रकाश मिळाल्यावर कॉर्टिसोल वाढतो आणि आपण जागे होतो. ही संपूर्ण प्रक्रिया संतुलित असेल तर शरीर निरोगी राहते.
पण दिवस-रात्र चक्राशी जुळलेली ही रचना नाईट ड्युटीमुळे बदलते. रात्री काम आणि दिवसा अपुरी झोप यामुळे नैसर्गिक सर्केडियन रिदम विस्कळीत होते. जागतिक आरोग्य संघटनेनेही शिफ्ट वर्कला संभाव्य आरोग्यधोका मानले आहे.
नाईट ड्युटी करणाऱ्या महिलांना अनेकदा दोन आघाड्यांवर लढावे लागते, कार्यक्षेत्र आणि घर. दिवसा कुटुंबासाठी उपलब्ध राहण्याची अपेक्षा आणि रात्रीची जबाबदारी यामुळे विश्रांतीला वेळ मिळत नाही. परिणामी झोपेची कमतरता आणि सततचा ताण हे आरोग्यावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक ठरतात.
रात्री अंधारात स्रवणारा मेलॅटोनिन हा झोपेसाठी महत्त्वाचा हार्मोन असतो. तेजस्वी प्रकाशात काम केल्याने त्याचे स्रवण कमी होते. त्याच वेळी तणावामुळे कॉर्टिसोल वाढतो. या बदलांचा परिणामामुळे पुढील समस्या निर्माण होऊ शकतात:
मासिक पाळीतील अनियमितता
झोपेचा अभाव आणि ताण यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. परिणामी पाळी अनियमित होणे, जास्त रक्तस्राव, किंवा पाळी बंद होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
पीसीओएसचा धोका
अनियमित झोप, वजन वाढ आणि इन्सुलिन रेसिस्टन्स यामुळे पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) होण्याची शक्यता वाढते.
थायरॉईड समस्या
दीर्घकाळ नाईट शिफ्ट केल्यास थायरॉईड हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. महिलांमध्ये आधीच थायरॉईडचे प्रमाण जास्त असल्याने हा धोका अधिक असतो.
मानसिक आरोग्यावर परिणाम
सतत झोपेचा अभाव, सामाजिक जीवनातील तुटलेपणा आणि कामाचा ताण यामुळे चिंता, नैराश्य, चिडचिड वाढू शकते.
प्रजनन क्षमतेवर परिणाम
काही संशोधनानुसार दीर्घकाळ नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये वंध्यत्वाचा धोका किंचित वाढलेला दिसतो.
मेलाटोनिन आणि कर्करोगाचा संबंध
मेलाटोनिन हे केवळ झोपेसाठीच नव्हे, तर अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते. रात्री कृत्रिम प्रकाशात काम केल्याने मेलाटोनिनची निर्मिती कमी होते. काही अभ्यासांमध्ये दीर्घकाळ नाईट शिफ्ट आणि स्तनाच्या कर्करोगामध्ये संबंध आढळल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
महिलांनी काय काळजी घ्यावी?
झोपेचे शिस्तबद्ध नियोजन
आहार नियोजन
नियमित व्यायाम
नियमित तपासणी
मानसिक आरोग्याची काळजी
व्यवस्थापन पातळीवर काय बदल हवेत?
सतत नाईट शिफ्ट न देता रोटेशनमध्ये बदल, पुरेशी विश्रांतीची सोय, महिला कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन सेवा, प्रकाशव्यवस्थेचे वैज्ञानिक नियोजन यासारखे काही मुलभूत बदल व्यवस्थापनाकडून केले गेले पाहिजेत.
नाईट ड्युटी टाळणे कदाचित शक्य नसते, पण योग्य जागरूकता, जीवनशैलीतील बदल आणि संस्थात्मक पाठबळ यांच्या साहाय्याने महिलांचे हार्मोनल आरोग्य नक्कीच सुरक्षित ठेवता येऊ शकते.
डॉ. श्रीयाने अखेर स्वतःसाठी वेळ काढला. तपासणी केली, झोपेची शिस्त लावली आणि शिफ्ट बदलण्यासाठी विनंती केली. काही महिन्यांत तिची तब्येत सुधारू लागली.
सर्केडियन रिदम ही शरीराची मूलभूत यंत्रणा आहे. लक्षात ठेवा, नाईट ड्युटी अपरिहार्य असली तरी शरीराच्या जैविक चक्राचा आदर करणे अत्यावश्यक आहे. तिचे संतुलन राखणे म्हणजेच दीर्घकालीन हार्मोनल आणि मानसिक आरोग्य जपणे आहे.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर