समानतेची पेरणी: एक शिक्षक

​शाळेत केवळ धडे न शिकवता लिंगभेदाच्या भिंती तोडून मुलांमध्ये समानतेची पेरणी कशी करावी? अनुभवातून आलेले काही प्रसंग आणि शिक्षक म्हणून बदलासाठी उचललेले एक छोटे पाऊल.

Story: शिकता शिकविता |
06th March, 10:13 pm
समानतेची पेरणी:  एक शिक्षक

खू​प वर्षांपूर्वीचा प्रसंग, रिझल्टचा दिवस होता. अनिशाची आई कदाचित सहा महिन्यांची गरोदर असावी, तशीच बारा वाजता आली होती. हातात ३ वर्षांची मुलगी होती आणि बघून समजत होते की परिस्थिती बेताची आहे. 'या बसा' म्हटले. 'पाणी हवे का?' विचारले, तर 'नको, लवकर जायचे आहे' असे सांगितले. अनिशा अभ्यासात खूप हुशार होती पण खूप शांत; कोणते तरी दडपण मनात आहे, हे माहित होते.

​अनिशाच्या आईशी बोलल्यावर समजले की, ती दुसरी मुलगी! तिचे बाबा आणि आजी तिच्या जन्मापासून तिचा तिरस्कारच करीत, कधी तिला जवळ घेतले नाही. ऐकून मन खच्चून गेले. त्या रडूनच म्हणाल्या, 'आता पण मला सांगितले आहे मुलगाच हवा, मुलगी झाली तर विकून टाकीन' आणि त्या खूप रडल्या. हे ऐकून खूप दिवस मन बेचैन होते. हा होता पहिला प्रसंग. मी अनिशाला खूप समजावले, आज ती पोलीस म्हणून वावरते आहे. बाबांना आपल्या नावावर घर बांधून दिले आहे. मला या मुलीचे खूप कौतुक वाटते.

​दूसरा प्रसंग, तारीख होती २ ऑक्टोबर २०१९. दरवर्षीप्रमाणे वर्गामध्ये स्वच्छता मोहीम राबवणे सुरू होते. मी सुद्धा माझ्या वर्गात साफसफाई करून घेत होते. सगळी मुलं उत्साहाने काम करीत होती, पण सूरज मात्र हात दुमडून एखाद्या नेत्याप्रमाणे उभा होता. 'जरा मागच्या बाजूचा फळा वर चढून पुस' असे मी सूरजला म्हटले, तर तो म्हणाला, 'टीचर, साफसफाई हे फक्त मुलींचे काम असते.' मला ऐकून धक्काच बसला. 'हे कुणी सांगितले तुला?' तर 'माझे बाबा घरात तसेच वागतात.' मला खरी चूक कुणाची हे समजले. सूरजला समजावले. 'आजच्या काळात कोणतेच काम पुरुषांचे आणि स्त्रियांचे असे राहिले आहे का?' याचा मुलांना दुसऱ्या दिवशी पटवून देण्याचा प्रयत्न केला. सूरजला आपली चूक कळली. त्या दिवसापासून रोज सूरज माझ्या वर्गात फळा पुसू लागला.

​आमच्या काळात शिक्षकाने लिंगभेद करू नयेत. वर्गात साफसफाईसारखे उपक्रम राबवताना समान काम वाटून द्यावे. मुलीबरोबर मुलांनाही घरातील साधी कामे शिकवून स्वावलंबी बनवावे. मी खूपदा मुलांना घरात काम केले तर कोठेही टिकू शकता, हे पटवून देते. माझ्या वर्गात गेल्या वर्षी आयुष नावाचा मुलगा शिकायचा. खूपदा तो उशिराने यायचा किंवा गैरहजर राहायचा. हुशार होता पण खूप शांत आणि गप्प गप्प असायचा. त्याच्याशी एक दिवस बोलले तर काहीच सांगेना. आईला बोलावले ती येईना. मग एक दिवस त्यांच्या घरी गेले, तर आयुष आणि त्याचा छोटा भाऊ झोपले होते. शेजाऱ्यांना विचारले तर समजले की, आयुषचे वडील कोरोनाने वारले आणि आई सकाळी साडेसहाला कामाला जाऊन रात्री आठला घरी यायची. घरचा स्वयंपाक आणि भावाला सांभाळून हा मुलगा शाळेत यायचा. खरंच केवढा आधार या पोराचा त्याच्या आईला! त्या दिवसापासून आयुषचा मला खरंच अभिमान वाटायला लागला. मी फक्त त्याला 'नियमित ये' एवढेच सांगत जाई.

​आपण शिक्षक म्हणून मुलांना समानतेचा फक्त अर्थ न समजावता ती कशी जनमानसात रुजवावी, याचा प्रयत्न करावा. मी आठवीला शिकवीत असताना मला 'वर्क एक्सपिरियन्स'चा तास दिलेला, तेव्हा त्या तासाला ग्लास पेंटिंग, फ्लॉवर मेकिंग, शिवणकाम मुलींबरोबर मुलांनाही शिकवले जाई. शिक्षकाने बोलताना सुद्धा मुलींना 'तुला हे जमणार नाही, तू मुलगी आहेस' किंवा 'तुझे ते काम नाही, तू मुलगा आहेस' असे म्हणू नये; कारण आपला प्रत्येक शब्द मुलांच्या मनावर खोलवर कोरला जातो.

​आवर्जून असे उपक्रम घ्यावेत ज्यात समानता बाळगली जावी. एक साधा उपक्रम म्हणजे खाद्यपदार्थ बनविण्याची स्पर्धा फक्त मुलींसाठी मर्यादित न ठेवता मुलांनाही भाग घेण्यास लावणे. खूपदा गावामध्ये मुलांना आई स्वयंपाकापासून दूर ठेवते, पण तसे न करता मुलांना कणिक मळणे, भाज्या निवडून देणे ही कामे सांगून त्यांना घरातल्या कामाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. वर्गामध्ये सुद्धा धान्य ओळख, मसाल्यातील जिन्नस आणून त्याची ओळख, रेसिपी शेअरिंग हे छोटे प्रयोग करू शकतो. मुलींना फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा खेळात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. आज काळाची गरज अशी आहे की, स्वावलंबी होऊन आपले काम तरी करता आलेच पाहिजे. आज कोणतेही काम कुणी एका लिंगानेच करावे असे राहिले नाही, जसे की सुनीता विल्यम्ससारखी 'Astronaut'. साधे उदाहरण म्हणजे मुंबईत मी पुरुष 'मेहेंदी आर्टिस्ट'ना महिलांपेक्षा उत्तम मेहेंदी काढताना बघून खूप थक्क झाले. कोणतेही काम लिंगावर अवलंबून नसते, ते आपण कसे करतो यावर असते.

​प्रणाम त्या थोर सावित्रीबाईंना ज्या आपल्यासाठी लढल्या. त्यांचे विचार पुढे नेत आपणास ते आत्मसात करून पुढची पिढी समानतेची घडवूया.


- श्रुती करण परब