भारत स्वतःचे अंतराळवीर पाठविण्याच्या उंबरठ्यावर

अवकाश तंत्रज्ञानाचे फायदे लोकांच्या दैनंदिन आयुष्यातही पोहोचत आहेत. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांसाठी हवामानाचे इशारे, शेतकऱ्यांसाठी पिकांचे नियोजन, दुर्गम भागातील संप्रेषण सुविधा, रस्ते व समुद्र मार्गांची सुरक्षितता यामध्ये उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही उपग्रह सीमारेषांचे निरीक्षण, आपत्ती निवारण, समुद्रावर लक्ष ठेवणे या सर्व कामात सहाय्य करत आहेत.

Story: दुर्बीण |
just now
भारत स्वतःचे अंतराळवीर पाठविण्याच्या उंबरठ्यावर

भारताचा अवकाश प्रवास २०२५ मध्ये महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांची पूर्तता यांची सांगड घालणारी एक वेगळीच कहाणी सांगतो. वर्षाची सुरुवात झाली ती NVS-02 या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाने, ज्यामुळे भारताची स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली NavIC आणखी मजबूत झाली. अमेरिकेच्या GPS प्रमाणेच परंतु भारताच्या गरजांसाठी खास डिझाइन केलेली ही प्रणाली जहाजे, रस्त्यावरची वाहतूक, शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज अशा रोजच्या जीवनाशी निगडित गोष्टींमध्ये अचूक मार्गदर्शन देणार आहे. जुलै महिन्यात तर मोठी कामगिरी घडली. ISRO (इस्रो) आणि NASA (नासा) यांनी मिळून NISAR हा जगातील अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह कक्षेत सोडला. हा उपग्रह ढगांमधूनही पाहू शकतो आणि जमिनीवरील काही सेंटीमीटर एवढे छोटे बदलही टिपू शकतो, त्यामुळे हिमालयातील वितळणारे हिमनग, पश्चिम घाटातील जंगलतोड, गर्दीच्या शहरांतील जमिनीचा खच यांचा अभ्यास वैज्ञानिक करू शकतील.

या वर्षाच्या शेवटी, डिसेंबरमध्ये, भारत आणखी ऐतिहासिक पाऊल टाकणार आहे. गगनयान मोहिमेचा पहिला मानवरहित प्रक्षेपक. या मोहिमेत व्योममित्रा नावाची बोलणारी मानवीय रोबोटिक प्रतिकृती सोबत असेल. हे प्रक्षेपण भविष्यातील भारतीय अंतराळवीरांना सुरक्षितपणे अंतराळात पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रणालीची चाचणी घेईल. दशकभर इतर देशांचे अंतराळवीर अंतराळात झेपावताना पाहिल्यानंतर आता भारत स्वतःचे अंतराळवीर पाठविण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

सरकारनेही यासाठी मोठा आराखडा आखला आहे. साल २०३५ पर्यंत भारतीय अवकाश स्थानक आणि २०४० पर्यंत मानवासहीत चंद्रमोहीम या स्वप्नांना गाठण्यासाठी ४० मजली इमारती इतके उंच रॉकेट तयार केले जात आहे, जे ७५ टन भार अवकाशात नेऊ शकेल. यशस्वी झाल्यास ते जगातील सर्वात शक्तिशाली प्रक्षेपकांपैकी एक ठरेल आणि भारत देश अमेरिका-चीनसारख्या महासत्ता देशांच्या बरोबरीला जाईल. परंतु २०२५ फक्त इस्रोपुरता मर्यादित नाही. खासगी क्षेत्रातील Skyroot, Agnikula, Pixxel सारख्या स्टार्टअप कंपन्याही झपाट्याने काम करत आहेत. छोट्या रॉकेट्सपासून ते प्रगत इमेजिंग सॅटेलाइटपर्यंत अनेक नवनवीन प्रकल्प त्यांच्याकडून राबवले जात आहेत. पाच वर्षांत ५ स्पेस-टेक युनिकॉर्न कंपन्या निर्माण करणे आणि दरवर्षी ५० प्रक्षेपणं साध्य करणे असे उद्दिष्ट पंतप्रधानांनी निश्चित केले आहे. या तरुण कंपन्यांमुळे अवकाश तंत्रज्ञान आता फक्त प्रयोगशाळांपुरते मर्यादित राहिले नसून उद्योग-व्यवसायाचा नवा चेहरा बनत आहे, रोजगार निर्माण करत आहेत, गुंतवणूक आकर्षित करत आहे आणि जगाला तंत्रज्ञान विकत आहे.

दरम्यान, अवकाश तंत्रज्ञानाचे फायदे लोकांच्या दैनंदिन आयुष्यातही पोहोचत आहेत. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांसाठी हवामानाचे इशारे, शेतकऱ्यांसाठी पिकांचे नियोजन, दुर्गम भागातील संप्रेषण सुविधा, रस्ते व समुद्र मार्गांची सुरक्षितता यामध्ये उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही उपग्रह सीमारेषांचे निरीक्षण, आपत्ती निवारण, समुद्रावर लक्ष ठेवणे या सर्व कामात सहाय्य करत आहेत.

याचबरोबर SpanDeX सारखे प्रयोग, ज्यात दोन उपग्रहांची अवकाशात डॉकिंग चाचणी यशस्वी झाली, यातून हे स्पष्ट आहे की भारत मानवी अवकाश प्रवास आणि उपग्रह दुरुस्ती सारख्या प्रगत तंत्रज्ञानासाठी सज्ज होत आहे.

ही सारी प्रगती पाहताना १९६० च्या दशकातील चित्र आठवते. त्याकाळी भारतात उपग्रहाचे भाग सायकल आणि बैलगाड्यांवरून प्रक्षेपण स्थळी नेले जात होते. आज तोच भारत अवकाश स्थानक आणि चंद्रमोहीमेची स्वप्ने पाहत आहे. सामान्य वाचकांसाठी कदाचित ही सगळी विज्ञानातील गुंतागुंत अवघड वाटेल, पण संदेश अगदी सोपा आहे, भारत आता कधी नव्हे इतक्या उंच भरारी घेण्यास तयार आहे आणि आत्मविश्वासाने जगाला अवकाशात आपली छाप दाखवतो आहे.


- डॉ. सुजाता दाबोळकर