आपल्या पुराणांत, वेदांत, उपनिषदांत मानसिक आरोग्याचे खोल संदर्भ आहेत. गणपती पुराण वाचताना जाणवतं, की बाप्पा म्हणजे केवळ विघ्नहर्ता नाही तर तो मनाचा सूक्ष्म चिकित्सक देखील आहे.
गणपती बाप्पा मोरया! वाचकहो, हा लेख तुमच्यापर्यंत पोहचेल तोवर काहींचे बाप्पा घरी येऊन गेलेही असतील, तर काहींकडे अजूनही बाप्पा मोदकांचा सुगंध घेत विराजमान असतील. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, “आज काय बरं सांगणार मानसी? मानसोपचारातले काही गहन विषय की अजून एखादी पेशंटची गंमत?” तर नाही हो! आजची गोष्ट आहे, दस्तुरखुद्द आपले गणपती बाप्पा आपल्याला मानसोपचार कसा शिकवतात याची!
होय, “मेंटल हेल्थ” हा काही नवा “ट्रेंड” नाही. उलट, आपल्या पुराणांत, वेदांत, उपनिषदांत मानसिक आरोग्याचे खोल संदर्भ आहेत. गणपती पुराण वाचताना जाणवतं, की बाप्पा म्हणजे केवळ विघ्नहर्ता नाही तर तो मनाचा सूक्ष्म चिकित्सक देखील आहे.
जसं की, गणपती अथर्वशीर्षात एक सुंदर श्लोक आहे:
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
“तू मनुष्याच्या जीवनाचा मूलाधार आहेस, शक्तीच्या त्रिवेणीचा केंद्रबिंदू आहेस.” पहा बरं, किती सुंदर सांगितलंय हे! गणपती बाप्पा आपल्या जीवनाचे मूळ आहेत. आणि म्हणूनच आपल्या मानसिक आरोग्याची मुळंही तेथेच आहेत, “मुलाधार”, म्हणजेच आपल्या भावनांचं, सुरक्षिततेचं, स्थैर्याचं केंद्र. मानसशास्त्राच्या भाषेत यालाच आपण ग्राउंडिंग म्हणतो. आजच्या धावपळीच्या काळात आपण “अनग्राउंडेड” होऊन ताण, चिंता आणि अस्वस्थतेत गुरफटून जातो. अशावेळी, ह्या श्लोकाद्वारे हेच आपल्याला शिकावयास मिळते की स्थिर रहा, आपल्या मूल्यांची साथ कदापि सोडू नका आणि स्थितप्रज्ञ राहा. मग वादळं तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. हा एक साधा पण प्रभावी माइंडफुलनेसचा धडा आहे.
अथर्वशीर्षातील आणखी एक श्लोक:
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं
रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम् ॥
या श्लोकातील खरी खोली अशी आहे की बाप्पांप्रमाणे आपलं मनही बहुआयामी आहे. कधी सृजनशील (ब्रह्म), कधी शांत (विष्णू), कधी कोपिष्ट (रूद्र), कधी अभिमानी (इंद्र). प्रत्येक भावनेचं अस्तित्व स्वीकारणं हेच भावनिक स्वास्थ्याचं मूलभूत तत्त्व आहे. ह्याबाबतीत, मला माझ्याकडे येणारे माझे प्रत्येक क्लायंट आठवतात. त्यांच्या मनातलं दुखणं त्यांच्यासाठी विश्वाइतकं मोठं असतं. परंतु त्याच वेळी, त्या प्रत्येकातली शक्तीही विश्वाइतकीच अपार असते. जणू ते मन सांगतंय, “तुझ्यातलं सामर्थ्य ओळख.”
गणपतीचं चरित्र हे मनाला आधार देणारं आहे. बाप्पाचं मोठं डोकं आपल्याला आठवण करून देतं, की विचारांचा विस्तार ठेवायला शिका. लहान लहान गोष्टीं जास्त मनावर घेऊ नका. घडलेल्या प्रत्येक गोष्टीकडे विविधांगी दृष्टिकोनातून पाहावं. मानसोपचारात आपण “कॉग्निटिव रीस्ट्रक्चरिंग” म्हणतो तीच गोष्ट ही. गणपतीचे मोठे कान, म्हणजे ऐकण्याची ताकद, अर्थात being a good listener! ह्यात ऐकणं म्हणजे फक्त शब्द ऐकणं नव्हे तर त्यामागचं माणसाचं मन, भावना, संघर्ष देखील ऐकणं, समजून घेणं. प्रत्येकाला फक्त ऐकून घेतलं गेलं तरी अर्धा ताण हलका होतो हेच ह्यातून बाप्पा आपल्याला सांगतात.
परंतु बाप्पा एवढ्यावरच थांबत नाहीत. तुम्हाला गणपती पुराणातली ती कथा आठवते? जेव्हा पार्वती मातेने गणपती बाप्पांची निर्मिती केली, तेव्हा त्यांचं एकच काम होतं, द्वाररक्षण. हे द्वार म्हणजे कशाचं प्रतीक? आपल्या मनाच्या द्वाराचं. कोणते विचार आत घ्यायचे आणि कोणते बाहेर ठेवायचे, हा निर्णय घेण्याची ताकद आपल्यात आहे आणि त्या मर्यादा आपण स्थापित करू शकतो अशा दृष्टिकोनातून देखील ह्या कथेकडे पाहता येते! आजच्या भाषेत सांगायचं तर, “बाउंडरीज सेट करणं.” सिग्मंड फ्रॉईडने अवचेतन मनाचं जे तत्त्व मांडलं, त्यातही हेच आहे.
एकदा माझ्या एका क्लायंटने मला सांगितलं, “बाप्पांच्या मूर्तीकडे पाहिलं की कसं शांत वाटतं.” अहो, हा नुसता भक्तिभावाचा परिणाम नाही, तर न्युरोसायन्स आहे. स्थिर, गोल आकाराचं दर्शन तेही आपण प्रेमाने स्वीकारलेलं, हे मेंदूत शांततेचे संकेत निर्माण करतं. ज्यामुळे, मानसविश्लेषणात ज्याला catharsis म्हणतात, तोच मोदकांच्या गोड सुगंधात, आरत्यांच्या गजरात, बाप्पांच्या “मी आहे” या आश्वासक उपस्थितीत आपोआप घडतो.
म्हणूनच, या वर्षी बाप्पाला निरोप देताना, एक प्रार्थना मनाशी ठेवा,
“बाप्पा, मला माझं मन ऐकता यावं, त्याला समजून घेता यावं, यासाठी सदैव माझ्यापाठीशी असा.”
आणि हो, लक्षात ठेवा, मन:शांतीचा पहिला मोदक हा बाप्पा आपल्यालाच देत असतो हो, फक्त तो आपण चाखायला तयार असलो पाहिजे!
मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४