प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर हा एक गंभीर पण वेळीच समजून घेतल्यास आटोक्यात येऊ शकणारा विकार आहे. योग्य निदान, उपचार आणि मानसिक मदतीने या विकारावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.
रम्या आणि रेवा जुळ्या बहिणी आहेत. दोघींनाही पीसीओएस (PCOS) असल्याने मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान त्रास होतो. पाळी येण्याच्या आठवडाभर आधी रम्याची थोडी चिडचिड होते. या काळात अभ्यासात थोडा कमी फोकस, पोट फुगणे, झोप जास्त येणे चालू असते. पण पाळी सुरू होताच सगळे परत सुरळीत होते. रेवाचे मात्र पाळी जवळ आल्यावर हास्य कुठेतरी हरवलेले असते, ती स्वतःलाच ओळखू न येणारी होते. छोटीशी गोष्टही तिला असह्य वाटते, रडू कोसळते. अगदी स्वतःला इजा करण्याचे विचारही तिच्या मनात येतात.
दोघींमध्ये तसाच त्रास असूनही अशी भिन्न लक्षणे का दिसतात? वैद्यकीय मदत घेतल्यावर समजले की रम्याच्या लक्षणांना पी.एम.एस. (Premenstrual Syndrome) तर रेवाच्या लक्षणांना प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (Premenstrual Dysphoric Disorder) म्हटले जाते. हे नेमके काय असते ते आपण आज जाणून घेऊ.
स्त्रियांना मासिक पाळीपूर्वी शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवणे सामान्य आहे. मात्र, काही स्त्रियांना हा त्रास खूप तीव्र स्वरूपात जाणवू शकतो, जो त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करतो. या गंभीर स्थितीला प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (पी.एम.डी.डी.) म्हणतात. यामध्ये मूड स्विंग्ज, नैराश्य, चिडचिड आणि शारीरिक वेदनांचा समावेश असतो.
प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर आणि प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम: वेगवेगळ्या स्थिती
प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर आणि प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम या दोन्ही मासिक पाळीपूर्वी अनुभवल्या जाणाऱ्या स्थिती आहेत, पण दोन्हीच्या तीव्रतेत आणि परिणामांमध्ये मोठा फरक आहे.
तीव्रता:
पी.एम.एस. (PMS): यामध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे असतात, ज्यामुळे दैनंदिन कामकाजावर जास्त परिणाम होत नाही.
पी.एम.डी.डी. (PMDD): ही अधिक तीव्र स्थिती आहे. यात लक्षणांची तीव्रता जास्त असते आणि ती दैनंदिन जीवनावर अधिक परिणाम करू शकते. पी.एम.डी.डी. असलेल्या महिलांना स्वतःला हानी पोहोचवण्याचे विचार येऊ शकतात, तर पी.एम.एस.मध्ये असे होण्याची शक्यता कमी असते.
मानसिक लक्षणे:
पी.एम.एस.: यामध्ये चिडचिड, मूड स्विंग्ज, अस्वस्थता जाणवते.
पी.एम.डी.डी.: यामध्ये पुढील गंभीर मानसिक लक्षणे दिसतात:
तीव्र नैराश्य, चिंता आणि चिडचिड होणे.
झोप न लागणे किंवा जास्त झोप येणे.
आत्महत्येचे विचार मनात येणे.
भावनांवर नियंत्रण न राहणे.
एकटेपणा व लोकांपासून दूर राहण्याची इच्छा होणे.
मनःस्वास्थ्य ढासळणे.
शारीरिक लक्षणे:
पी.एम.एस.: स्तनांची जळजळ, पोटदुखी, अपचन, पाठीचा त्रास, झोपेची समस्या ही साधारणपणे आढळणारी लक्षणे आहेत.
पी.एम.डी.डी.: यामध्ये पुढील लक्षणे दिसतात:
स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि स्तनांमध्ये वेदना होणे.
थकवा, लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे.
भूक न लागणे, जास्त भूक लागणे किंवा विशिष्ट अन्न खाण्याची इच्छा होणे.
झोपेच्या तक्रारी (जास्त झोप येणे किंवा झोप न लागणे).
सूज येणे, पोट फुगणे (ब्लोटिंग) किंवा वजन वाढल्यासारखे वाटणे.
दैनंदिन जीवनावर परिणाम:
पी.एम.एस.: त्रासदायक असले तरी या दरम्यान महिला आपले रोजचे कामकाज करू शकतात.
पी.एम.डी.डी.: या स्थितीत मात्र दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. नोकरी, नाती आणि सामाजिक आयुष्यावरही गंभीर परिणाम होतो.
पी.एम.डी.डी.ची कारणे:
पी.एम.डी.डी.चे नेमके कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही, पण काही संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात:
इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये होणारे बदल.
मेंदूतील सेरोटोनिनच्या पातळीत बदल.
कुटुंबात पी.एम.एस.चा इतिहास असणे.
मानसिक ताणतणाव.
पी.एम.डी.डी.चे निदान:
याची लक्षणे मासिक पाळीच्या आधी सुरू होतात आणि मासिक पाळी सुरू झाल्यावर काही दिवसांत कमी होतात. डॉक्टर शारीरिक तपासणी आणि मानसिक आरोग्य चाचण्यांद्वारे याचे निदान करतात.
लक्षणांचे निरीक्षण: सलग २-३ महिने पी.एम.डी.डी. येण्याआधी लक्षणांची नोंद ठेवावी लागते.
डीएसएम-५ निकष: अमेरिकन सायक्याट्रिक असोसिएशनने दिलेले निदान निकष वापरले जातात.
नैराश्य, एंग्झायटीसारखे इतर विकार नाहीत याची खात्री करणे.
उपचार:
उपचारांमध्ये औषधे, समुपदेशन आणि जीवनशैलीत बदल यांचा समावेश असतो.
अँटीडिप्रेसंट्स: मूड सुधारण्यासाठी.
जन्मनियंत्रण गोळ्या: हार्मोन नियंत्रणासाठी.
एन.एस.ए.आय.डी. (NSAID): शारीरिक वेदना कमी करण्यासाठी.
सप्लीमेंट्स: कॅल्शियम, मॅग्नेशियम, बी६.
कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT): विचार व भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत करते.
काही महिलांसाठी, जीवनशैलीतील बदल जसे की नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे खूप फायदेशीर ठरू शकते.
- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर