गोवा ही पवित्र भूमी : भारतरत्न सचिन तेंडुलकर

काणकोणच्या मल्लिकार्जुन विद्यालयात ‘कला क्रीडा आंगण’चे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd August, 06:56 pm
गोवा ही पवित्र भूमी : भारतरत्न सचिन तेंडुलकर

काणकोण : गोवा ही पवित्र भूमी आहे. गोव्यात जाणार असल्याचे आईला सांगितले तेव्हा तिने मला मंदिरांना भेट देऊन देवाचे आशिर्वाद घे, असे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सांगितले.
चाररस्ता-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात ‘कला, क्रीडा आंगण’ या बहुउद्देशीय इनडोअर सभागृहाचे उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी तसेच सचिनचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन तेंडुलकर यांनी दीपप्रज्वलन करून व फीत कापून इनडोअर क्रीडांगणाचे उद्घाटन केले. या इनडोअर मैदानात बाल क्रिकेटपटू मोक्षद शंभा देसाई याला चेंडू टाकून त्यांनी खेळाचा शुभारंभ केला. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांचा तेंडुलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे व श्री मल्लिकार्जुन चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे अध्यक्ष चेतन मंजू देसाई, शिक्षण संचालक शैलेश सिनाई झिंगडे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. अजित देसाई, मल्लिकार्जुन देवालयाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, संस्थेचे अध्यक्ष शांबा नाईक देसाई, नगराध्यक्षा सारा शंभा देसाई तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सचिन तेंडुलकराला पाहण्यासाठी विद्यालय परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. उपस्थितांनी ‘भारताचा खरा रत्न’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शांबा देसाई यांनी केले. मनोज नाईक गावकर आणि दीपा देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर ओंकार देसाई यांनी आभार मानले.
आयुष्यात शॉर्टकट नसतो : तेंडुलकर
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तेंडुलकर म्हणाले, क्रिकेटमध्ये आणि आयुष्यात संधी मिळतात, त्या योग्य पद्धतीने साधा. कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. शिस्त पाळा आणि मेहनतीने मार्गक्रमण करा. क्रिकेट माझा व्यवसाय नसून माझी आवड होती म्हणून मी क्रिकेटमध्ये एवढ्या गोष्टी साध्य करू शकलो. तुम्ही पण स्वप्न बघा आणि ते प्रत्यक्षात आणा, असे आवाहन त्यांनी केले.