मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून कर्णधारपदासाठी शार्दुल ठाकूरला पसंती?
मुंबई : आशिया कप २०२५ च्या भारतीय संघातून वगळल्यानंतर फलंदाज श्रेयस अय्यरला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेने मुंबई संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतरही श्रेयसला हे पद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्याऐवजी शार्दूल ठाकूरकडे मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा आहे.
नेतृत्वाचा अनुभव असूनही श्रेयसला डावलले
अजिंक्य रहाणेने गुरुवारी (दि. २१) सोशल मीडियावर मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला. त्यानंतर हे पद श्रेयसला मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. श्रेयसकडे मुंबईच्या व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. त्याने मुंबईला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली आहे, तरीही त्याचा कर्णधार म्हणून विचार का केला जात नाही, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित होत आहे. शार्दूल ठाकूर २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोनचे नेतृत्व करणार असल्यामुळे तो मुंबईच्या नेतृत्वासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
पंजाब किंग्सला फायनलमध्ये पोहोचवले
आयपीएलच्या १८ व्या हंगामात श्रेयसने त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहोचवले होते आणि ६०० हून अधिक धावा केल्या होत्या. तरीही निवड समितीने त्याला आशिया कपसाठी योग्य मानले नाही. त्यामुळे आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे, हे निश्चित आहे.
गेल्या दोन वर्षांतील कामगिरीकडे दुर्लक्ष?
गेल्या दोन वर्षांत श्रेयसने प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बीसीसीआयने त्याला २०२४ मध्ये वार्षिक करारातून वगळले होते. त्यानंतर त्याने देशांतर्गत, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करून भारताच्या विजयात त्याने निर्णायक भूमिका बजावली.