जगभरातील ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचे संकेत
चेन्नई : अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधूनही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनने या निर्णयाची माहिती आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर जाहीर केली असून, त्यानुसार आता तो जगभरातील विविध फ्रँचायझी लीग्समध्ये खेळण्यास सज्ज आहे.
आयपीएलमध्ये अश्विन सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत १८७ विकेट्ससह पाचव्या स्थानी आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल पदार्पण केले, नंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघांमध्येही तो खेळला. पंजाब संघाचे नेतृत्व करण्याचा सन्मानही अश्विनला लाभला होता.
२०१० आणि २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलवर कब्जा केला होता आणि अश्विन त्या संघाचा अविभाज्य भाग होता. यंदाच्या हंगामात दीर्घ काळानंतर चेन्नई संघात परतलेला असला तरी अश्विनला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. चेन्नईने ९.५ कोटी रुपये खर्चून त्याला संघात समाविष्ट केले, पण १४ पैकी फक्त ९ सामन्यात त्याला संधी मिळाली. अश्विनच्या गोलंदाजीवर फलंदाज सहजतेने धावा काढत होते, आणि त्यामुळे तो हंगामादरम्यान अपेक्षित परिणाम देऊ शकला नाही.
आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यामुळे अश्विन आता जगभरातील विविध लीग्समध्ये खेळू शकतो. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना आयपीएलव्यतिरिक्त अन्य लीग्समध्ये खेळण्याची परवानगी नाही, पण निवृत्तीनंतर अश्विन ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, दक्षिण आफ्रिकेतील एसए २०, दुबईतील आयएल २०, इंग्लंडमध्ये होणारी द हंड्रेड आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये भाग घेऊ शकतो.
कसोटी प्रकारात भारतात सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान त्याने अचानक निवृत्ती घेतली होती, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता.
अश्विनची एकूण संपत्ती ११७ कोटी रुपये आहे. चेन्नईत त्याने ९ कोटी रुपयांचे घर खरेदी केले असून, येथे त्याची पत्नी प्रीती नारायणन आणि दोन मुली राहतात. त्याच्याकडे ऑडी क्यू ७ सोबतच रॉल्स रॉईस, व्होल्वो अशा आलिशान गाड्याही आहेत.
त्याची वार्षिक कमाई सुमारे १० कोटी रुपये आहे. बीसीसीआयने त्याला ग्रेड ए मानांकन दिले होते, ज्यामुळे मॅच फी व्यतिरिक्त तो ५ कोटींची कमाई करत होता. आयपीएल २०२४च्या लिलावात चेन्नईने त्याला ९.७५ कोटी रुपयांमध्ये संघात समाविष्ट केले होते.
अश्विनने अनेक लोकप्रिय ब्रँड्ससाठी जाहिरात केली आहे. यामध्ये मिंत्रा, बॉम्बे शेविंग कंपनी, मन्ना फूड्स, एरिस्टोक्रॅट बॅग्स, ओप्पो, मूव्ह, स्पेसमेकर्स, कोको स्टुडियो तमिळ यांचा समावेश आहे.
अश्विनची गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही कौशल्ये संघासाठी मोलाची ठरली. त्याने ३७ इनिंग्जमध्ये पाच विकेट्स घेण्याची अद्भुत किमया साधली असून, फलंदाजीमध्येही संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला.
रवीचंद्रन अश्विनची निवृत्ती भारतीय क्रिकेटसाठी एक मोठा टप्पा आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो आता जागतिक क्रिकेट लीग्समध्ये चमकू शकतो. ज्यामुळे प्रेक्षकांना जगभरातील विविध लीग्समध्ये अश्विनची फिरकी पाहण्याची संधी मिळणार आहे.
कारकिर्दीतील महत्त्वाचे आकडे
कसोटी सामन्यात : १०६ सामन्यात ५३७ बळी, ३७ इनिंग्जमध्ये पाच विकेट्स, सर्वोच्च खेळी ७ बळी (५९ धावा)
फलंदाजी : ३,५०३ धावा, स्ट्राईक रेट २५.७५, ६ शतके, १५ अर्धशतक, सर्वोच्च स्कोअर १२४
वनडे : ११६ सामन्यात ७०७ धावा, १५६ बळी
कारकिर्दीचा आढावा
२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण
२०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा सदस्य
भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान
खेळलेले संघ
चेन्नई सुपर किंग्ज (२००९-२०१५, २०२५)
दोनदा (२०१०, २०११) आयपीएल विजेतेपदात मोठा वाटा.
पॉवरप्लेमध्ये स्वस्तात मोलाच्या विकेट्स घेण्याची खासियत.
रायझिंग पुणे सुपरजायंट (२०१६-२०१७)
चेन्नईवरील बंदीमुळे पुणे संघातून खेळला.
२०१७ मध्ये दुखापतीमुळे पूर्ण सत्र गमावले.
किंग्ज इलेव्हन पंजाब (२०१८-२०१९)
कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली
कर्णधार म्हणून नवीन रणनीती वापरल्या; उदाहरणार्थ ‘मंकडिंग’ करून जोस बटलरला बाद केलेली घटना चर्चेत राहिली.
दिल्ली कॅपिटल्स (२०२०-२०२१)
संघाला फायनलमध्ये पोहोचण्यात मदत केली.
राजस्थान रॉयल्स (२०२२-२०२४)
२०२२ मध्ये फायनल गाठलेल्या राजस्थानच्या मोहिमेत मोठे योगदान.
सीनियर मेंटरासारखा कार्यरत आहे आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताे
आयपीएलमधील कामगिरी
सामने: २२१
फलंदाजीतील धावा:८३३
बळी :१८७
सरासरी धावगती (इकॉनॉमी रेट): ७.२
आयपीएलमधील ठळक कामगिरी
चेन्नईसोबत २ विजेतेपदे (२०१०, २०११)
राजस्थानसोबत फायनल (२०२२)
पॉवरप्लेमध्ये सलामीवीरांना त्रास देणारा ऑफ-स्पिनर म्हणून प्रसिद्ध.
विविध टप्प्यांवर डावपेच वापरण्याची त्यांची खासियत. ‘कॅरम बॉल’, ‘दूसरा’ आणि ‘फ्लोटर’.