मानवी तस्करी विरोधी पथकाची कारवाई, एकास अटक
मडगाव : कोलवा येथे वेश्या व्यवसायासाठी पश्चिम बंगालच्या युवतींना आणण्यात आल्याची माहिती मिळताच मडगाव मानवी तस्करी विरोधी पथकाच्या पोलिसांनी छापा टाकत दोन युवतींची सुटका केली. याप्रकरणी सुरेश नायक (३३, रा. मूळ कर्नाटक) याला अटक करण्यात आली.
कोलवा येथे वेश्या व्यवसायासाठी मुलींना घेऊन एक युवक येणार असल्याची माहिती मडगाव येथील मानवी तस्करी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. दक्षिण गोवा जिल्हा अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक पाठवून त्यानुसार कोलवा येथील हॉटेल सिल्वा रोझानजीक छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी संशयित सुरेश नाईक याला रंगेहाथ पकडण्यात आले. सुरेश नाईक हा मूळ कर्नाटक येथील असून सध्या बाणावली येथे वास्तव्यास आहे. त्याच्यासह संशयित राजू (रा. पश्चिम बंगाल) हा यात सहभागी होता.
संशयिताने वेश्या व्यवसायासाठी पश्चिम बंगाल येथून आणलेल्या दोन युवतींची सुटका करत त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईसाठी पोलिसांनी ‘अर्ज’ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली होती. सुरेश याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुदिक्षा नाईक याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.