मध्यप्रदेशातील बरवाहा येथे प्रशिक्षण सुरू
वास्को : महिलांना आघाडीच्या ऑपरेशनल भूमिकांमध्ये आणण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रथमच महिला कमांडो युनिटची स्थापना केली आहे. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपक्रम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आपल्या पहिल्या पूर्णपणे महिला कमांडो टीमला महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये समाविष्ट करण्यास सज्ज झाले आहे.
मध्यप्रदेशातील बरवाहा येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात महिला कमांडोंचे प्रशिक्षण सुरू आहे. हा आठ आठवड्यांचा प्रगत कमांडो कोर्स महिला कर्मचाऱ्यांना उच्च सुरक्षा आस्थापने व प्लांटमध्ये क्किक रिअक्शन टीम व स्पेशल टास्क फोर्सच्या कामांसाठी तयार करणार आहे. प्रशिक्षण काळात शारीरिक व शस्त्र प्रशिक्षण, तणाव, सहनशक्ती, रॅपलिंग, स्लाईडिंग, जंगलात राहणे, प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता, टीमवर्कची चाचणी इत्यादी ४८ तासांचे आत्मविश्वास निर्माण करणारे व्यायाम यांचा समावेश आहे.
सध्या विविध विमानतळावर तैनात असलेल्या ३० महिलांची पहिली तुकडी ४ ऑक्टोबरपर्यंत तर दुसरी तुकडी ६ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत प्रशिक्षण घेणार आहे. आरंभीच्या टप्प्यात विविध विमानतळ सुरक्षा गट, संवेदनशील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल विभागांतील किमान १०० महिला सहभागी होणार आहेत. प्रशिक्षणानंतर त्यांना प्रामुख्याने विमानतळांवर आणि व नंतर इतर संवेदनशील आस्थापनांमध्ये तैनात केले जाणार आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पुरुषांचे क्षेत्र मानले जाणाऱ्या क्षेत्रात हे एक पाऊल आहे. सध्या गृह मंत्रालयाने १० टक्के महिलांचे लक्ष्य ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल महिलांची भरती वाढवित आहे. सध्या १२ हजार ४९१ (आठ टक्के) महिला आहेत. २०२६ मध्ये २४०० महिलांची भरती केली जाणार आहे.