शिरगावातील फुले विक्रेत्यांना धमकी
म्हापसा : शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या मंदिर परिसरात फुले विक्रेत्यांकडून तलवारीचा धाक दाखवून खंडणी वसूल करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित अजय अनंत गावकर (रा. शिरगाव) याचा अटकपूर्व जामीन अर्ज मेरशी येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
अजय गावकर हा देवस्थानचा महाजन आहे. त्याने जत्रा व उत्सवांमध्ये सोपो कर वसुलीसंदर्भात ग्रामपंचायतीशी करार केला होता. हा करार फक्त उत्सवाच्या काळापुरताच होता. तरीही गरीब विक्रेत्यांकडून धमकी देऊन तो पैसे उकळत होता. त्याच्याविरुद्ध ८ गुन्हे नोंद होते, त्यातील ६ आपापसात मिटवले गेले आहेत. त्यामुळे अर्जदाराच्या वर्तनाचा विचार करता अधिक गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याची आणि त्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याची शक्यता आहे. शिवाय संशयिताचे वर्तन आणि तो पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे पाहून जामीन अर्ज फेटाळण्यास पात्र आहे, असे निरीक्षण न्यायाधीश क्षमा जोशी यांनी नोंदवले.
संशयिताच्यावतीने न्यायालयात अॅड. एस. गोवेकर तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील एस. पाटील यांनी युक्तीवाद केला.
दरम्यान, डिचोली पोलिसांनी दि. ५ ऑगस्ट रोजी संशयिताविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३०८(४) व ३१५(३) कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी उषा गावकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. हा गुन्हा नोंद झाल्यावर अटक टाळण्यासाठी संशयिताने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.
संशयिताला शिरगाव गावातील जत्रा आणि उत्सवा दरम्यान लागणाऱ्या फेरीतील फेरीविक्रेत्यांकडून सोपो कर वसुलीचे कंत्राट शिरगाव पंचायतीने दिले होते. हे कंत्राट त्याला २ मे २०२५ रोजी दिले होते. शिरगाव मंदिराच्या आवारातील फुले विक्रेत्यांकडून सोपो कर घेण्याची अनुमती या निविदेत नव्हती. तरीही संशयिताने दि. १९ ते दि. २९ जुलै २०२५ या कालावधीत फिर्यादी व त्यांच्या सहकारी विक्रेत्यांकडून ५७ हजार ३५० रुपये सोपो कर रक्कम वसुल केली. गळ्याला तलवार लावून ही रक्कम न दिल्यास गळा चिरण्याची धमकी त्याने दिली होती.