सांकवाळ येथे एएनसीची कारवाई, २२६ ग्रॅम गांजा जप्त
म्हापसा : उसापनगर सांकवाळ येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने राहुल उप्पालदीन्नी (३३, जुने वाडे सांकवाळ) या स्वीगी डिलिव्हरी बॉयला गांजासह अटक केली. संशयित आरोपी हा स्वीगी डिलिव्हरीच्या नावाखाली सांकवाळ व वास्को परिसरातील युवावर्गाला ड्रग्जचा पुरवठा करीत होता.
शनिवारी दि. २३ रोजी रात्री उशीरा एएनसीच्या पथकाने ही कारवाई केली. राहुल याच्याकडून २२ हजार ६०० रुपये किमतीचा २२६ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला.
सांकवाळ परिसरात स्वीगी डिलिव्हरी बॉयच्या वेशातील एक युवक तरूणांना अन्नपदार्थांची डिलिव्हरी करण्याच्या नावाखाली मादक पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला (एएनसी) मिळाली होती.
पोलिसांनी या भागात दक्षता ठेवली होती. संशयित आरोपी हा ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी दुचाकीवरुन येताच पोलिसांनी त्याला पकडले. झडतीवेळी त्याच्याजवळ २२६ ग्रॅम गांजा सापडला. संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक साजिथ पिल्लई, उपनिरीक्षक सुनील फाळकर, सहाय्यक उपनिरीक्षक संदीप कोनाडकर, कॉ. राहुल गावस, साईराज नाईक, मकरंद घाडी, योगेश मडगावकर व कंदन पटेकर या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ड्रग्ज पॅडलर्सकडून डिलिव्हरी बॉयचा वापर
राहुल हा गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज पुरवठा व्यवसायात गुंतला असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले आहे. यापूर्वी उत्तर व दक्षिण गोवा पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणात अन्नपदार्थ पुरवठा सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयना अटक केली होती. त्यामुळे ड्रग्जच्या तस्करीसाठी या डिलिव्हरी बॉयचा वापर ड्रग्ज पॅडलर्सकडून केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.