थोरवत कुटुंबाकडे दोन कोटींच्या खंंडणीची केली होती मागणी
मडगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक श्रीनिवास थोरवत यांच्या कुटुंबाकडे दोन कोटींची खंडणी मागण्याच्या प्रकरणी अटक केलेल्या वॉल्टर फर्नांडिस आणि इतर तीन संशयितांना मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
थोरवात यांनी फातोर्डा पोलिसात तिरुपती वारकुरी आणि अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, लेबर कंत्राटदार असलेल्या तिरुपतीशी त्यांची २०१७ मध्ये ओळख झाली. २०१९ मध्ये आगाळीतील एका अपार्टमेंटचे काम केले असून त्याचे पैसेही अदा केले होते. बाणावलीतील एका बंगल्याच्या कामासाठीही पैसे दिले, तरी कामात विलंब झाला आणि केलेल्या कामापेक्षा जास्त पैसे अदा करावे लागले.
जानेवारी २०१४ मध्ये तिरुपतीने बेळगावमधील नव्या प्रकल्पातील फ्लॅट (१.३० कोटी) देण्याची मागणी केली होती, परंतु त्याला नकार देण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी ओळखीतल्या नसीर शेख यांच्या सांगण्यावरून थोरवात कुटुंबीयांवर काही व्यक्ती नजर ठेवून असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना भेटायला बोलावले.
दरम्यान, चारही संशयितांनी मडगाव न्यायालयात जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना २५ हजारांचा वैयक्तिक बाँड, २५ हजारांचा हमीदार सादर करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि पोलीस तपासात सहकार्य करणे या अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
खंडणीच्या मागणीसह दिली धमकी
१४ ऑगस्टला चौगुले कॉलेजनजीक हॉटेल येथे थोरवातांना तिरुपती आणि त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तींनी भेटीला बोलावले. या वेळी त्यांनी दोन कोटी रुपये न दिल्यास कुटुंबीयांच्या सुरक्षिततेवर परिणाम होईल, अशी धमकी दिली. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी तिरुपती वारकुरी, वॉल्टर फर्नांडिस, रोहित फळदेसाई आणि विनोद थोताड यांना अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यावर १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.