पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी माड कापून केली पायवाट मोकळी
जमीनदोस्त झालेले घरासमोरील तुळशी वृंदावन.
वार्ताहर। गोवन वार्ता
हरमल : खालचावाडा येथील गोकर्णकर यांच्या घरावर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे माड कोसळल्याने घरातील काही भाग उघडा पडला. सुदैवाने ‘श्रीं’ची मूर्ती सुखरूप राहिली. घरासमोरील तुळशी वृंदावन जमीनदोस्त झाले. गोकर्णकर कुटुंबियांनी आपत्कालीन परिस्थितीत विघ्नहर्त्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन केले.
गुरुवारी सायं. ६ च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धोकादायक माड मुळापासून उपटून मधुकर गोकर्णकर यांच्या घरावर कोसळला. यामुळे घरात प्रतिष्ठापित केलेल्या श्री गणेशमूर्तीच्या वरील बाजू उघडी पडली. कौले व लाकूड सामान पूर्णतः कोसळले. घरासमोरील तुळशी वृंदावन जमीनदोस्त झाले. छपराचे लाकडी सामान, तुळशी वृंदावन व कौले मिळून लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, वडिलोपार्जित घर जीर्ण झाले आहे. मुसळधार पावसामुळे मातीच्या भिंती फुगण्याची शक्यता असून त्या कोसळण्याची भीती गोकर्णकर यांनी व्यक्त केली. माजी पंच प्रवीण वायंगणकर, समाजकार्यकर्ते राजेश गोकर्णकर आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. अद्यापही या घरावर एक माड व आंब्याचे झाड कलंडलेल्या स्थितीत आहे, असे गोकर्णकर यांनी सांगितले. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी माड कापून पायवाट मोकळी केली.