वास्को : स्विगी डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज पुरवणारा अटकेत

एएनसीची कारवाई : ६० हजारांचा ५९.८० ग्रॅम गांजा जप्त

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27th August, 12:06 am

पणजी : स्विगी डिलिव्हरी बॉयकडून ड्रग्ज पुरवठा झाल्याच्या प्रकरणात अनिकेत मुचंदिकर (रा. बोगमोळो व मूळ बेळगाव) या मुख्य गांजा पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे. जयरामनगर-वास्को येथे अमली पदार्थविरोधी विभागाने (एएनसी) ही कारवाई केली. त्याच्याकडून ६० हजारांचा ५९.८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी दि. २३ रोजी रात्री उशिरा उपासनगर-सांकवाळ येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने राहुल उप्पालदिन्नी (३३, जुने वाडे सांकवाळ) या स्विगी डिलिव्हरी बॉयला एएनसी पथकाने गांजासह अटक केली होती. संशयित आरोपी स्विगी डिलिव्हरीच्या नावाखाली सांकवाळ व वास्को परिसरातील युवावर्गाला ड्रग्जचा पुरवठा करीत होता. राहुल याच्याकडून २२ हजार ६०० रुपये किमतीचा २२६ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला होता.
सांकवाळ परिसरात स्विगी डिलिव्हरी बॉयच्या वेशातील एक युवक तरूणांना अन्नपदार्थांची डिलिव्हरी करण्याच्या नावाखाली मादक पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला (एएनसी) मिळाली होती. पोलिसांनी या भागात दक्षता ठेवली होती. संशयित आरोपी ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी दुचाकीवरून येताच पोलिसांनी त्याला पकडले. झडतीवेळी त्याच्याजवळ २२६ ग्रॅम गांजा सापडला होता. संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी मुख्य गांजा पुरवठादार अनिकेत मुचंदिकर (रा. बोगमोळो व मूळ बेळगाव) याला अटक करण्यात आली.
एएनसीचे उपअधीक्षक नेर्लन अल्बुकर्क यांनी अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील फाळकर यांनी निरीक्षक संजित पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली.