गोव्यात विविध कारणांमुळे एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू

तिघांचा दारुमुळे मृत्यू : मॉर्निंग वॉकवेळी एकाचा, तर दुसऱ्याची आत्महत्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th August, 11:58 pm
गोव्यात विविध कारणांमुळे एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू

म्हापसा : राज्यात रविवारी पाच जणांचे मृतदेह सापडले. आमोणे पुलाखाली सापडलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. जुने गोवे परिसरात दोन, तर पणजी फेरी धक्क्याजवळ नदीत एकाचा मृतदेह सापडला. फोंडा येथे सकाळी मॉर्निंग वॉकवेळी कोसळून एकाचा मृत्यू झाला.

रविवार, दि. २४ रोजी सकाळी जुने गोवे येथील दर्गा परिसरातील बिर्याणी कॉर्नर आस्थापनाजवळ मीर्झा बाजू सोरेने (२६, ओडिशा) या युवकाचा मृतदेह सापडला. हा युवक बिर्याणी कॉर्नरवरच हेल्पर म्हणून कामाला होता. तो दारुच्या आहारी गेला होता. त्याच्या पोटात दुखत असल्याने तो दोन दिवस रजेवर होता. त्याला गोमेकॉत दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुसरा मृतदेह तासाभराने जुने गोवे पोलीस स्थानकाजवळील गटारात सापडला. तानाजी गायकवाड (६२, रा. मुळ कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तो दारूच्या नशेत गटाराच्या कडेवर रात्री झोपला. गटारात पडून त्याचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा जुने गोवे पोलिसांनी केला.

पणजी येथील फेरी धक्क्याजवळ मांडवी नदीपात्रात अजित नाईक (२४, ओडीशा) याचा मृतदेह सापडला. ही घटना दुपारी उघडकीस आली. तो दारुच्या आहारी गेला होता. नदीच्या कडेला झोपला असता नदीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. पणजी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवला.

मांडवी नदीत सापडला मृतदेह

आमोणा पुलाखाली मांडवी नदीत एका ४० ते ५० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह दुपारी आढळून आला. डिचोली पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. शवचिकित्सेसाठी गोमेकॉत त्याचा मृतदेह पाठवून देण्यात आला. त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

फुटपाथवर कोसळून मृत्यू

फोंडा येथे मॉर्निंग वॉकला जाताना फुटपाथवर अचानक कोसळून स्थानिक रहिवासी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. तो कुंडई येथील एका फार्मास्युटीकल कंपनीमध्ये कामाला होता.