म्हापशातील पे पार्किंग कामगारांवर सुरी हल्ला प्रकरण
म्हापसा : मरड, म्हापसा येथील खासगी पे पार्किंग शुल्क घेणाऱ्या दोघा कामगारांवर सुरी हल्ला करीत खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या चारही संशयित आरोपींना म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर अवैधरीत्या चालणारा हा खासगी पे पार्किंगचा व्यवसाय शुक्रवारपासून खंडित करण्यात आला आहे.
म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी खोब्रावाडा-कळंगुट येथील भूवन गोवेकर (१८), साईश गोवेकर (२५) व मरड सांगोल्डा मधील रूपसाई आरोंदेकर आणि अनिकेत शिरोडकर यांना शुक्रवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या संशयितांना पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पकडून अटक केली होती.
ही घटना गणेश चतुर्थी दिनी बुधवारी दि. २७ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान मरड, म्हापसा येथील रिजीम प्लाझा कॉम्पलेक्सच्या आवारातील खासगी पे पार्किंगस्थळी घडली होती. या सुरी हल्ल्यात प्रकाश तलवार व संदीप कुमार हे दोघे कामगार जखमी झाले होते.
घटनेवेळी संशयितांपैकी एकाने आपली दुचाकी घटनास्थळी पार्क केली. तिथे पे पार्किंग शुल्क आकारणी सेवेवर तेथे तैनात असलेल्या जखमी संदीप कुमार या कामगाराने संबंधिताला गाडी व्यवस्थित पार्क करण्यास सांगितली. यावरून हा वाद झाला व संशयितांनी संदीप व प्रकाश यांच्यावर हल्ला केला होता. जखमी प्रकाश तलवार याच्या पोटावर सुरीने तर संदीपच्या डोक्यावर गाडीच्या चावीने वार केला होता.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली भा.न्या.सं.च्या ३०७ कलमान्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांमया मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांचे पत्र मिळताच अवैध पे पार्किंग बंद
या प्राणघातक हल्लाप्रकरणी या घटनेस कारणीभूत रिजीम प्लाझा कॉम्पलेक्सच्या आवारात सुरू असलेल्या खासगी पे पार्किंगबाबत म्हापसा पोलिसांनी म्हापसा नगरपालिकेला तपशीलवार माहिती सादर करण्याची सूचना केली. पोलिसांचे हे पत्र पालिकेला मिळल्यावर शुक्रवारी दि. २९ पासून संबंधित इमारत मालकाने चालवलेला हा खासगी पे पार्किंगचा व्यवसाय बंद केला. या अवैधरीत्या चालणाऱ्या पे पार्किंगबाबत मात्र पालिकेने आपले हात वर केले आहेत.