एअरगन दाखवून धमकावण्याचा प्रकार एकतर्फी प्रेमातून!

चार जणांना अटक, जामिनावर सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th August, 11:50 pm
एअरगन दाखवून धमकावण्याचा प्रकार एकतर्फी प्रेमातून!

मडगाव : येथील होली स्पिरिट चर्चजवळ एअरगन दाखवून धमकावण्याची घटना एकतर्फी प्रेमामुळे घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. सध्या सर्व संशयितांना जामिनावर सुटकेची परवानगी देण्यात आली आहे.

फातोर्डा पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात युवकाला एअरगनचा धाक दाखवण्याची घटना घडली. यापूर्वी १२ ऑगस्ट रोजी मुंगुल येथे गोळीबार झाला होता. त्यानंतर सोमवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एअरगन दाखवण्याचा प्रकार घडला. सुरावली येथील विनय आरोंदे या युवकाने फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अनोळखी व्यक्तीने होली स्पिरिट चर्चनजीक त्याची गाडी थांबवून त्याला बंदूक दाखवून धमकी दिली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासली. चौकशीअंती पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हे कृत्य घडल्याचे चौकशीनंतर समोर आले.

सध्या पोलिसांनी या प्रकरणात आणखी तपास सुरू केले असून, घटनेच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच, संशयितांनी धमकी देण्यासाठी वापरलेली एअरगन ताब्यात घेत तपास केला जाणार आहे.

स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण केले असून, पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या घटनांबाबत तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

फातोर्डा पोलिसांनी याप्रकरणी चौकशीअंती अमन कुमार (कोलवा), शंकर शिल्लीक्याटर (रा. कोलवा, मूळ बेळगाव), करण राठोड (रा. पेडा बाणवली) व विनय आरुंदे (रा. पर सुरावली) यांना ताब्यात घेत चौकशी केली. चारही संशयितांना अटक करण्यात आली. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.