अभ्यास दौऱ्यावर आलेल्या म्हैसूरच्या युवकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th August, 12:07 am
अभ्यास दौऱ्यावर आलेल्या म्हैसूरच्या युवकाचा मृत्यू

म्हापसा : गोव्यात म्हैसूरहून अभ्यास दौऱ्यावर आलेल्या ४० जणांतील धनुष कुमार (१८, म्हैसूर कर्नाटक) या पॉलिटेक्निक महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याला उच्च मधुमेह होता. तो नियमित औषधे व इन्सुलिन घेत होता. या आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवार, दि. २२ रोजी सायंकाळी म्हैसूर कर्नाटकातील एका तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मिळून एकूण ४० जणांचा गट अभ्यास दौऱ्यासाठी गोव्यात आला होता. हा गट हडफडे येथील एका रिसॉर्टमध्ये थांबला होता. हॉटेलवर पोहोचल्यानंतर काही वेळाने धनुष उलट्या करू लागला.

लगेच त्याला हणजूण येथील खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल केले. उपचार केल्यावर त्याला पुन्हा रिसॉर्टवर नेण्यात आले. रात्री १०.३० वा. सुमारास पुन्हा तो उलट्या करू लागला. त्यानंतर त्याला खासगी इस्पितळात व तिथून गोमेकॉत पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी धनुषच्या मोठ्या भावाकडे चौकशी केली. धनुष कुमार याला उच्च मधुमेह होता. तो नियमितपणे औषधे घेत असल्याचे त्याने सांगितले. या मृत्यूमागे कोणत्याही प्रकारचे संशयाचे कारण नसल्याचे पोलीस चौकशीतून आढळून आले अाहे. हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे.